गोंदिया जिल्ह्यात 36 सारस पक्ष्यांची नोंद

गोंदिया: जिल्ह्यामध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गोंदिया वनविभाग व जिल्ह्यातील विविध अशासकीय संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सारस पक्षी प्रगणना करण्यात आली. या गणनेत जिल्ह्यात 36 सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील सारस पक्ष्यांचे अधिवास असलेल्या गोंदिया, तिरोडा, आमगाव, सालेकसा, देवरी व अर्जुनी मोरगाव या तालुक्यांतर्गत एकुण 64 ठिकाणी अशासकीय स्वंयसेवी संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, वनविभागाच्या अधिकारी व वनकर्मचार्‍यांनी ही गणना केली. सारस पक्ष्यांची प्रगणना करण्यासाठी एकूण 42 चमू तयार करण्यात आल्या होत्या. या चमुमध्ये जिल्ह्यातील सेवा संस्था, हिरवळ बहुउददेशीय संस्था, गोंदिया निसर्ग मंडळ, सातपुडा फाउंडेशन या अशासकीय संस्थेचे एकूण 92 स्वंयसेवक, सारस मित्र तसेच वनविभागातील 50 वनकर्मचार्‍यांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला. या लोकांनी सारस पक्ष्यांचे अधिवास असलेले पाणथळ जागा, नद्या, शेतांमध्ये, तलांवाजवळ जाऊन पाहणी करुन सारस पक्ष्यांची प्रगणना केली. सारस पक्षी प्रणना यशस्वीतेसाठी सहभागी अशासकीय संस्थेचे स्वंयसेवक, सारस मित्रांना वनविभागाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत, असेही कुलराज सिंह यांनी सांगितले आहे.

Share