रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा : खा. नेते

गोंदिया: विविध कारणांमुळे रस्त्यावर होणार्‍या अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. मानवाचा जीव अत्यंत मोलाचा असून रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना खासदार व समिती अध्यक्ष अशोक नेते यांनी दिल्या.

खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संसद रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला खा. सुनील मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, कार्यकारी अभियंता एन. टी लभाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे व अधिकारी यावेळी उपस्थित होते. खा. नेते यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील रस्त्यावर असणार्‍या ब्लॅक स्पॉटची संख्या कमी करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. सध्या जिल्ह्यात आठ ब्लॅक स्पॉट आहेत. जिल्ह्यातील रस्त्यावर असणार्‍या स्पीड ब्रेकरचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रत्येक रस्त्यावर ट्राफिक साईन असल्याची खात्री करून घ्यावी असे त्यांनी सांगितले. यावेळी 108 अम्ब्युलन्स सेवेचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच जिल्ह्यात रस्ता सुरक्षा संबंधी कामकाजावर लक्ष ठेवणे, रस्त्यावर होणार्‍या अपघाताची आकडेवारी ठेवणे, रस्त्यावर होणार्‍या अपघातांच्या कारणांचे अध्ययन व उपाययोजना करणे, अपघात प्रवण स्थळांची निश्चिती करणे व त्यांच्यात सुधारणा करणे, रस्ते सुरक्षा विषयक मानकांची निश्चिती, रस्ते अपघात आढावा, ब्लॅक स्पॉट आढावा व उपाययोजना, अपघाताचे विश्लेषण करण्यासाठी आयआरएडी पचा वापर, जीवनदूत योजना, रस्त्यावर दिशादर्शक, माहितीदर्शक फलक लावणे व रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणार्‍यास बक्षिस

रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केल्यास आपल्याला पोलिस त्रास देतील असा नागरिकांचा समज आहे. असे अजिबात नसून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ उपचार मिळण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. मदत करणार्‍या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये असे न्यायालयाचे निर्देश आहेत. अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणार्‍या व्यक्तीला आता जिल्हास्तरावर पाच हजार रुपये रोख बक्षिस देण्यात येणार असल्याचे खा. नेते यांनी यावेळी सांगितले.

Share