पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली

देवरी : जिल्ह्यात इंद्राच्या हंगामात मान्सूनपूर्व पाऊस पडलाच नाही. मृग नक्षत्र लागून आठवडा लोटत असताना पावसाने दांडी मारल्याचे चित्र आहे. शेतकर्‍यांनी शेतीचे मान्सूनपूर्व नियोजन करून शेतात पीक लागवडीसाठी तयार करून ठेवले आहे. पावसाने अजून विलंब केल्यास खरिपातील पेरण्याही लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मशागतीची इतर कामेही लांबणीवर पडू शकतात.

शेतकरी वर्गाने शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. सध्या ते चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असून, पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. पाऊस पडण्याच्या आशेवर शेतकरीवर्ग असून, पुर्वतयारी म्हणून शेतकर्‍यांनी बी-बियाणे, खते, कृषी साहित्याची खरेदी केली आहे. जूनचा दुसरा आठवडा संपला तरी वातावरणात अजूनही उकाडा कायम आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. धरणी माता देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या काही वर्षांत पावसाची अनियमितता, दुबार पेरणी संकट, अतिवृष्टी, कीटकांचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस आदी गोष्टींमुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे.

देशातील विविध हवामान संस्थांनी यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस आणि वेळेवर मान्सून दाखल होऊन समाधान कारक प्रजन्यमान वृष्टीचा अंदाज वर्तविल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र अद्यापही जिल्ह्यात पावसाचा ठाव ठिकाणा नसल्याने बळीराजाच्या आनंदावर पूर्णपणे विरजण घातले आहे. विहिरी, बोअरवेलने, जलाशये, प्रकल्पांनी तळ गाठला आहे. त्यात उन्हाळ्याची तीव्रता कायम असल्याने शेतीतील पिकांची तहान अजून वाढली आहे. जिल्ह्यात मुख्यत्वेकरून भाताचे पीक घेतले जाते लागवड क्षेत्राच्या सुमारे 1 लाख 90 हजार क्षेत्रावर यंदाच्या हंगामात भात लागवडीचे नियोजन शेतकर्‍यांनी केले आहे. मात्र पावसाचा ठावठिकाणा नसल्याने शेतकर्‍यांची धाकधूक वाढली आहे.

Share