लाचखोर सहायक पोलिस निरीक्षकासह इसम एसीबीच्या जाळ्यात
आमगाव: गुन्हा दाखल न करण्यासाठी शेतकर्याकडून खाजगी इसमाद्वारे लाच स्विकारणार्या आमगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासह खासगी इसमाला लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले. श्रीकांत पांडुरंग पवार (37) असे आरोपी सहायक पोलिस निरीक्षकाचे तर अनिल किसनलाल सोनकवरे (37) रा. गोरठा, असे आरोपी खासगी ढाबा मालकाचे नाव आहे. सदर कारवाई रविवार, 12 जून रोजी शहराजवळील गोरठा येथील अमृत ढाबा येथे रात्री करण्यात आली.
सविस्तर असे की, तक्रारदार हे शेतकरी असून ते भूखंड खरेदी-विक्रीचे काम करीत होते. त्यांनी आमगाव येथे भूखंड खरेदी-विक्री केलेले आहेत. आरोपी श्रीकांत पवार याने तक्रारदार यांच्या मोबाइलवर फोन करून, त्यांच्या विरोधात सरकारी जमीन विकल्याची तक्रार आल्याचे सांगीतले. आपल्यावर गुन्हा दाखल होईल. कारवाईला सामोरे जायचे नसेल तर मला 5 लाख रुपये द्या. सदर रक्कम घेवून आमगाव पोलिस ठाण्यात या, असे बोलून तक्रारदाराला लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारारीच्या अनुषंगाने योग्य पडताळणी करण्यात आली. यात आरोपी लाच मागत असल्याचे स्पष्ट झाल्याने रविवारी संध्याकाळी सापळा कारवाई करण्यात आली. तडजोडीअंती 2 लाख रुपये लाच रकमेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 1लाख रुपये ढाबा मालक आरोपी अनिल सोनकवरेच्या हस्ते स्वीकारले. आरोपी श्रीकांत पवार याला ताब्यात घेवून दोन्ही आरोपींविरुद्ध आमगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.