देवरीच्या नगरसेविका पिंकी व पारस कटकवार यांचा नेत्रदानाचा संकल्प

डॉ. सुजित टेटे @प्रहार टाईम्स

देवरी 11: नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, पण जनमानसात याविषयी जनजागृती नसल्याने सहसा कुणी नेत्रदान करण्यासाठी पुढे येत नाही. जर लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेतला तर नेत्रदानाविषयी जनजागृती होऊ शकते, हाच धडा देवरी चे नगरसेविका पिंकी व पारस कटकवार यांनी घालून दिला आहे. जागतिक दृष्टी दिनानिमित्ताने मरणोत्तर नेत्रदान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे, तसेच नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना नवसंजीवनी मिळणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एखाद्या नेत्रहीन व्यक्तीला मरणोत्तर नेत्रदानामुळे पुन्हा दृष्टी मिळू शकते. परंतु नेत्रदानाकरिता नागरिक फारसे पुढे नसल्याने नेत्रदानाची कमतरता असून ही चिंतेची बाब आहे. यामुळे नेत्रदानाचे महत्व नागरिकांना व्हावे, यासाठी स्वत: मरणोत्तर नेत्रदान करणार असल्याची माहिती पिंकी व पारस कटकवार यांनी दिली.
नेत्रदानाचे महत्व पटवून देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच नगरपंचायत माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

अंध व्यक्तींना नवीन नेत्र बसवून त्यांना नवसंजीवनी देण्याचे तंत्रज्ञान प्रगत आहे. मात्र, नेत्रदात्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने आपण गरजूंना नवीन नेत्र बसवू शकत नाही. जर आपण मरणोत्तर नेत्रदान केले तर निश्चित गरजूंना त्याचा उपयोग होईल आणि त्यांना नवसंजीवनी देता येईल. असे मत पिंकी कटकवार यांनी व्यक्त केले.

Share