कर्जाची परतफेड वेळेत करा : सीईओ पाटील

गोंदिया: सरकारच्या विविध योजनांसाठी बँकेमार्फत कर्ज दिले जाते. कर्जाचा लाभार्थ्यांना अल्प व्याज दराने पुरवठा केला जातो. कर्ज घेतेवेळी आपण आपल्या व्यवसायाचे नियोजन करणे आवश्यक आहे. बँक कर्ज योजनांचा लाभ घेऊन त्याची वेळेत परतफेड आवश्यक आहे. लाभार्थ्यांनीही गरज लक्षात घेऊनच नियोजन करावे व कर्जाची परतफेड वेळेत करून आपली आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.

बँकांनी जास्तीत जास्त व्यक्तींना बँकिंग व विविध शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्याकरिता बँक ऑफ इंडिया, अग्रणी जिल्हा बँकद्वारे ग्राहक जनसंपर्क अभियान अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. मेळाव्याला नागपूरच्या उप महाप्रबंधक-रिजर्व बँक ऑफ इंडिया रेहमत पारकर, उप-आंचालिक प्रबंधक-बँक ऑफ इंडिया अंचल, गवलीकर, सहाय्यक महाप्रबंधक रिजर्व बँक ऑफ इंडियाचे हनुमा कुमारी, अग्रणी जिल्हा प्रबंधक -बँक ऑफ इंडिया उदय खर्डेनवीस यांच्यासह विविध बँक शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. प्रसंगी उदय खर्डेनवीस यांनी भारत सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या जन समर्थ पोर्टल बद्दल माहिती दिली. ज्यांच्या माध्यमातून तेरा शासकीय योजनांचा लाभ एक पोर्टल वरून घेऊ शकतो. या योजनांमध्ये शैक्षणिक कर्ज, कृषी पायाभूत सुविधा कर्ज, उद्योगासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टॅन्ड अप योजना तसेच महिला बचत गटासाठी आजीविका अश्या विविध योजनांचा लाभ एका पोर्टल वरून घेऊ शकतो.

त्यासोबतच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रममध्ये सेवा उद्योगांकरिता 10 लाख, उत्पादन उद्योगांकरिता 25 लाख रुपयापर्यंत कर्ज घेण्याची मर्यादा असल्याचे खर्डन्वीस यांनी सांगीतले. रेहमत पारकर यांनी चलनी नोटांच्या ओळखी कश्याप्रकारे करायची व रिजर्व्ह बँक तसेच डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देऊन त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होऊ शकतो याकरिता यूपीआय 123 बद्दल माहिती दिली. गवलीकर यांनी बँक कर्ज घेणे व त्याची वेळेवर परतफेड करणे महत्वाचे असून त्यामुळे अधिक व्यक्तींना कर्ज पुरवठा करता येऊ शकतो. आपले कर्ज खाते हे एनपीए होऊ न देणे ही कर्जदाराची व बँकेची महत्वाची जवाबदारी असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी जिल्ह्यातील बँकांनी विविध योजना अंतर्गत मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणाची मंजुरी अर्ज वितरीत करण्यात आले. मेळाव्यात बँक शाखांनी आपले स्टॉल लावून भेट देणार्‍यांना सुवर्ण ऋण, कृषी कर्ज, गृह कर्ज, सुष्म लघु मध्यम उद्योग कर्ज आदी विविध बँक कर्ज योजनांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालान व आभार आरसेटीचे निदेशक राहुल गणवीर यांनी मानले

Print Friendly, PDF & Email
Share