आता वाहन, परवानाधारकांचा वाचणार वेळ

◼️मध्यस्थांची गरज नाही , सहा सेवा फेसलेस

गोंदिया: शासकीय करभारात पारदर्शकता यावी, जनसामान्यांची कामे सुलभ व्हावीत, नागरिकांना व लाभार्थ्याना सेवा प्रदान करतांना कमीत कमी वेळेत अधिकाअधिक सेवा देता यावी यासाठीच प्रशासकीय कारभार डिजीटल होत आहे. एकेकाळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परवाना मिळण्यासाठी लांबच लांब रांग लागायची आता हे चित्र कमी झाले असून 1 जूनपासून परिवहन कार्यालयाने त्यांच्या सहा सेवा फेसलेस व आभासी केल्यामुळे नागरिकांचा वेळ तर वाचणारच आहे. सोबतच पारदर्शक सेवा प्राप्त होणार आहे.

सारथी प्रणाली अंतर्गत अनुज्ञप्ती नुतनीकरण, अनुज्ञप्ती दुय्यम प्रत, अनुज्ञप्तीमध्ये पत्ता बदलविणे या तीन सेवा तर वाहन 4.0 मध्ये वाहनासंबधीत वाहनाची दुय्यम नोंदणी पुस्तिका, नोंदणी पुस्तिकेमध्ये पत्ता बदलविणे व नाहरकत प्रमाणपत्र या तीन सेवा अशा एकूण सहा सेवा आभासी व फेसलेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. यासाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात येण्याची गरज नसून घरबसल्या ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सारथी प्रणाली अंतर्गत शिकाऊ अनुज्ञप्तीची सेवा ही यापूर्वीच आभासी व फेसलेस करण्यात आली आहे. संकेतस्थळाचा वापर करुन नागरिक या सेवा प्राप्त करुन घेऊ शकतात. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करुन घरबसल्या या सेवा मिळणार आहेत. यामूळे नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहेत.

मध्यस्थांची मदत घेऊ नये: राजवर्धन करपे

परिवहन विभागाने नागरिकांच्या सोईसाठी पारदर्शक सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ही सेवा पुर्णतः आभासी असून या सुविधेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थ्यांनी कोणत्याही मध्यस्थांची, दलालाची मदत घेऊ नये, असे आवाहन उप्रप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share