आता व्याघ्र दर्शनाची पर्यटन सफारी ऑफलाईन
गोंदिया: जिल्हा वनांनी नटलेला आहे. या वनांत विविध वन्य प्राण्यांचे विचरण आहे. वन्यप्राण्यांच्या दर्शनासाठी वनविभागाच्या संबंधित साईटवरून आभासी नोंदणीनंतरच जंगल सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येत होता. मात्र आता पर्यटकांना प्रत्यक्ष नोंदणी करून जंगल सफारी करता येणार आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात रस्ते पर्यटनाकरीता सुव्यवस्थीत राहील्यास 16 ते 30 जून या कालावधीत केवळ ऑफलाईन बुकिंग करुन स्पॉट बुकिंग पध्दतीनेच पर्यटकांना प्रवेश करता येईल. अति पावसामुळे रस्ते ना दुरुस्त झाल्यास व वाहन चालने शक्य नसल्यास वाहनास प्रवेश बंद राहणार आहे. या काळात ऑनलाईन पध्दतीने सफारी पुर्णपणे बंद राहील. तसेच सदर कालावधीत पाऊस आल्यास व रस्ते पर्यटक वाहनाकरीता अयोग्य ठरल्यास लघुसुचनेव्दारे पर्यटन केव्हाही बंद करण्यात येईल. त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत अंतर्गत व्यवस्थापनाकरीता नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे पर्यटन ऑनलाईन व ऑफलाईन बुकिंग पुर्णपणे बंद राहणार असल्याचे गोंदिया उपवनसंरक्षक तथा नवेगाव नागझिरा राखीव क्षेत्राचे संचालक जयरामे गौडा आर. यांनी कळविले आहे.