गोंदियातील 1292 शाळा होणार ‘धूरमुक्त’, शाळांना मिळणार गॅस कॅनेक्शन

गोंदिया: करोनाकाळात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार कोरड्या स्वरूपात मिळत होता. परंतु आता जनजीवन सुरळीत झाल्यानंतर शाळादेखील नियमितपणे सुरू होणार आहेत. या पृष्ठभूमीवर, आता जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेसाठी पात्र असलेल्या शाळांना शिक्षण विभागाने प्रत्येकी 4 हजार 90 रुपये एवढा निधी गॅस जोडणीसाठी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका व खासगी अनुदानित शाळांना या निधीतून गॅस जोडणी दिली जाणार असून जिल्ह्यातील 1292 शाळा ‘धूरमुक्त’ होणार आहेत.

केंद्र शासनाच्या ‘मीड डे मील’ योजने अंतर्गत वर्ग 1 ते 8 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतच पोषण आहार दिला जातो. प्रत्येक शाळेत पोषण आहार शिजविण्यासाठी चुलीचा वापर केला जात होता. शाळेजवळच आहार शिजविला जात असल्याने चुलीतील धूर वर्गात पसरून विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यामुळे शाळा धूरमुक्त करण्यासाठी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील 1292 शाळा पात्र झाल्या आहेत. या शाळांना गॅस जोडणीसाठी निधी देण्यात आला आहे. शिक्षण संचालक कार्यालयाकडून शाळांच्या बँक खात्यावर हा निधी आभासी वितरित झाला आहे. शासननिर्णयातील निर्देशानुसार, गॅस एजन्सीकडून शालेय व्यवस्थापन समितीने गॅस जोडणी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एलपीजी जोडणीसाठी पात्र शाळांना प्रत्येकी 4 हजार 90 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. शाळांना एकाच एजन्सीकडून जोडणी घ्यावी लागणार आहे. सूचनाही मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे.

Share