मानव-वन्यजीव संघर्षात 6 वर्षात 17 जणांचा मृत्यू

गोंदिया: जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात अनेक गावांचा समावेश आहे. अनेकदा गावात, शेतात शिरून वन्यप्राणी मानवांवर हल्ले करतात. गत सहा वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 17 जणांना प्राणास मुकावे लागले आहे. दोनशेपेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

गोंदिया जिल्हा वनांनी नटलेला आहे. नवेगावबांध, नागझिरा अभयारण्याचा जिल्ह्यात समावेश आहे. या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. अनेकदा मानवी हस्तक्षेपामुळे किंवा भक्ष, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शेतशिवार, गावाकडे धाव घेतात. अशा वेळी अनेकदा मानवांवर हल्ल्यांच्या घटना घडतात. गत सहा वर्षात वन्यप्राण्यांकडून मानवांवर हल्ले झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात 17 जणांना प्राणास मुकावे लागले आहे तर 200 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अनेक जण कुटुंब प्रमुख असल्याने त्यांचे कुटुंब आर्थिक संकटाशी संघर्ष करीत आहेत. शासन नियमानुसार वन विभागातर्फे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.

असे असले तरी कुटुंबप्रमुखाची भरपाई आर्थिक मदतीतून होणे शक्य नाही. वनक्षेत्राला लागून असलेली गावे, शेतात मानवांवर वन्यप्राण्यांचे हल्ले होतच आहेत. अनेकदा हे वन्यप्राणी गावात प्रवेश करून मानव-वन्यजीव संघर्ष पहावयास मिळतो. वर्ष 2017-18 मध्ये दोघांनी, 2018-19 व 2019-20 मध्ये प्रत्येकी 3 जणांनी प्राण गमावला. वर्ष 2020-21 मध्ये 4, वर्ष 2021-22 मध्ये 3 आणि वर्ष 2022-23 मध्ये 2 अशा 17 जणांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यापैकी 15 मृतकांच्या परीजणांना 1 कोटी 87 लाख रुपयांची तर 200 गंभीर जखमींना 1 कोटी 15 लाख 83 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Share