गोंदियाचा निकाल 97.37 टक्के, यंदाही मुलींच बाजी

गोंदिया:राज्य शिक्षण मंडळाद्वारे 8 जून रोजी इयत्ता बारावीचा निकाल मंडळाच्या वेबसाईटवर आभासी पद्धतीने जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात सर्व शाखेचा मिळून एकूण निकाल 97.37 टक्के लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली. 98.22 टक्के मुली तर 96.54 टक्के मुले उत्तीर्ण झाले. नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल ठरला असून कला व वाणिज्य शाखेत प्रथम असून विज्ञान शाखेत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

कोरोना महागारीचा सर्वच क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्राला मोठी झळ बसली आहे. याच कारणामुळे मागील वर्षी सर्वच प्रकारच्या शालेय परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मागील वर्षी आभासी पद्धतीने शाळा, महाविद्यालये सुरु झाली असली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन निघाले नव्हते. त्यामुळे यंदा ऑफलाईन पद्धतीने झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष होते. इयत्ता बारावीचा निकाल आज, 8 जून रोजी शिक्षण मंडळाने जाहीर केला. जिल्ह्यातील 10,066 मुले व 9,853 मुली अशा एकूण 19919 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 9,718 मुले व 9,676 मुली असे एकूण 19396 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 96.54 व मुलींची 98.22 टक्के एवढी आहे. विज्ञान शाखेतील 5078 मुले व 5317 मुली अशा 10,395 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 5054 मुले व 5300 मुली अशा 10,340 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून 99.25 टक्के मुले व 99.68 मुली उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतील 494 मुले व 439 मुली अशा 933 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 481 मुले व 434 मुली अशा 915 विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली असून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 97.36 व मुलींची टक्केवारी 98.86 टक्के आहे. कला शाखेतील 4202 मुले व 4024 मुली अशा 8226 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 3916 मुले व 3878 मुली अशा एकूण 7794 विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. यात 93.19 टक्के मुले व 96.37 टक्के मुली उत्तीर्ण झाले. व्होकेशनल शाखेतील 291 मुले व 73 मुली अशा 364 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. Gondia result यापैकी 280 मुले व 66 मुली उत्तीर्ण झाल्या असून त्याची टक्केवारी अनुक्रमे 96.21 व 90.41 अशी आहे.

अर्जुनी मोर तालुक्याचा Gondia result निकाल सर्वाधिक 98.24 टक्के लागला असून गोंदिया तालुका 97.86 टक्के, आमगाव 97.27 टक्के, देवरी 96.83 टक्के, गोरेगाव 96.52 टक्के, सडक अर्जुनी 96.95 टक्के, सालेकसा 96.95 टक्के व तिरोडा तालुक्याचा निकाल 97.13 टक्के लागला आहे. जिल्ह्यातील एकूण 171 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या गुणांची पडताळणीकरिता 10 ते 20 जूनदरम्यान व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मागविण्याकरिता 10 ते 29 जूनदरम्यान शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आभासी पद्धतीने मागविण्याची शुल्कासह सुविधा उपलब्ध केली आहे. 

नागपूर विभागात जिल्हा अव्वल

आज जाहीर झालेल्या इयत्ता Gondia result बारावीच्या निकालात नागपूर विभागामध्ये गोंदिया जिल्ह्याने सर्वाधिक निकाल दिला आहे. कला व वाणिज्य शाखेत प्रथम ठरला आहे. कला शाखेचा निकाल 94.74 टक्के व वाणिज्य शाखेचा 98.07 टक्के निकाल लागला आहे. तर विज्ञान शाखेचा निकाल 99.47 टक्के लागला असून विभागात दुसरा क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 3616 विद्यार्थी गुणवंत श्रेणीत, 9297 प्रथम श्रेणीत, 5663 द्वितीय श्रेणीत व 571 उत्तीर्ण झाले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share