दीड महिन्याच्या मुलाचा लसीकरणानंतर मृत्यू

गोंदिया:शहरातील बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात आज, 8 जून रोजी लसीकरणानंतर काही तासातच एका दीड महिन्याचा बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मृत बालकाच्या पालकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रुग्णालय प्रशासन आणि दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शहरातील मामा चौक परिसरात राहणार्‍या शारदा बोरकर या आपल्या दीड महिन्याच्या मुलाला लसीकरणाकरीता आज सकाळी 11 वाजता रुग्णालयात घेऊन आल्या होत्या. रुग्णालयात उपस्थित परिचारिकांनी त्यांच्या मुलाला दीड महिन्यानंतर दिली जाणारी रोग प्रतिकारक लस दिली. त्यानंतर रुग्णालयात काही वेळ थांबून त्या घरी जात असताना वाटेतच मुलाचे हृदयाचे ठोके बंद असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी तात्काळ रुग्णालयात गाठले असता डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. यानंतर पालकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. विशेष म्हणजे, मात्र सकाळी याच रुग्णालयात जवळपास 27 चिमुकल्यांचे लसीकरण करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्वस्थ आहे. मात्र या बालकाला पोलिओचा डोस देताना परिचारिकेकडून बाळाचे नाक दाबले गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसात तक्रार केली. तर डॉक्टरांनी बालकाला लसीकरणाचे इन्फेक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे स्पष्ट होईल.

Print Friendly, PDF & Email
Share