धक्कादायक ! बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांनीची आत्महत्या

लाखनी 09: नुकताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून या निकालात कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना ८ जून रोजी सायंकाळच्या सुमारास लाखनी येथे घडली. या घटनेत मयुरी किशोर वंजारी (१८) रा. लाखणी या विद्यार्थिनीने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. मयुरीला कला शाखेत ५५ टक्के गुण मिळाल्याने तिने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

मयुरी ही लाखनीच्या समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. ८ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास बारावीचा निकाल घोषित झाला. या निकालात मयुरीला कला शाखेत ५५ टक्के गुण मिळाले. वर्षभर अभ्यास करूनही कमी गुण मिळाल्याने ती निराश झाली. याबाबत तिने कुणालाही काही सांगितले नाही. दरम्यान, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मयुरीने विष घेतल्याचे कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला उपचारार्थ तात्काळ लाखनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिकच गंभीर असल्याने तिला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र ५ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. 

मयुरीचे वडील फर्निचर कामगार म्हणून काम करतात. तिच्या मागे आई-वडील मोठी बहीण आणि लहान भाऊ असा परिवार आहे. मयुरीने टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Share