माझी वसुंधरा’ अभियानात विभागात सौंदड ग्रापंचा गौरव
सडक अर्जुनी: ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेत नागपूर विभागात सर्वोत्तम कामगिरी करत तालुक्यातील सौंदड ग्रामपंचायतीने केवळ गावाचाच नव्हे, तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. याबद्दल राज्य सरकारकडून नुकताच सन्मान देखील करण्यात आला आहे.
ग्लोबल वॉर्मिगमुळे आज पर्यावरणाची मोठी हानी झाली असून सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. पृथ्वीचा विनाश थांबवायचा असेल तर पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण शिवाय पर्याय नाही. ही बाब लक्षात घेत राज्य सरकार कडून ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यभर राबवून भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. यात सौंदड ग्रामपंचायतीने नागपूर विभागात सर्वोत्तम कामगिरी केली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांचा गौरव सन्मान सोहळा मुंबई येथे रविवार, 5 जून 2022 रोजी पार पडला.
या सोहळ्याच्या अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. विशेष अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण संवर्धन मंत्री आदित्य ठाकरे, मनीषा म्हैसकर आणि पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत सौंदडच्या सरपंचा गायत्री इरले, ग्रामविकास अधिकारी जगदीश नागलवाडे, ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत यशस्वी होण्याकरीता विशेष परिश्रम घेणारे युवा नेटवर्क समुहाचे संस्थापक वृक्षमित्र रोशन शिवणकर, ग्रापं सदस्य मिनाक्षी विठ्ठले यांनी हा पुरस्कार स्विकारला. विशेष म्हणजे मागील 4 वर्षापासून सौंदड ग्रामपंचायत आपल्या विविध प्रकारच्या नवीन उपक्रमांसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. यासाठी गावकर्यांसह युवा नेटवर्क समूहाचे विशेष योगदान लाभत असून गावाची आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आता पुन्हा एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून पुरस्कार मिळाल्याने गावाच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे हे, विशेष!
यशाचे श्रेय गावकर्यांना…
सौंदड गावाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने आमचे परिश्रम निरंतर सुरू आहे. यात संपूर्ण गावकर्यांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभत असल्यानेच हे सर्व साध्य होत आहे. येथील प्रत्येक नागरिक यशाचा शिलेदार असून हा पुरस्कार आम्ही गावकर्यांच्या परिश्रमाला समर्पित करीत असल्याचे सरपंचा गायत्री ईरले यांनी सांगितले.