चिचेवाडा येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे शुभारंभ
◼️रब्बी धान खरेदीचे उद्दिष्टे व मर्यादेत वाढ करण्या करीता शासनस्तरावर प्रयत्न करणार: आमदार कोरोटे
देवरी, ता.०८: मागच्या वर्षी या जिल्ह्यात २५ लाख क्विंटल धान खरेदी झाली होती. याच धर्तीवर यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांचे रब्बी धान खरेदी झाली पाहिजे व शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकार वर दबाव टाकून येत्या काही दिवसात रब्बी धान खरेदीच्या उद्दिष्टे व मर्यादेत वाढ करण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
आमदार कोरोटे हे आदिवासी विकास महामंडळ देवरी अंतर्गत येणाऱ्या चिचेवाडा येथील आदिवासी सहकारी संस्थेच्या सोमवारी (ता.६ जून) रोजी आयोजीत रब्बी हंगामातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटनीय भाषणात बोलत होते.
या धान खरेदी केंद्राचे उदघाटन आमदार सहषराम कोरोटे व सह उदघाटक आदिवासी महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनांग यांच्या हस्ते आणि माजी आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी जि.प.च्या महिला व बाल कल्याण सभापती सविताताई पुराम, देवरी पं.स.चे सभापती अंबिकाताई बंजार, उपसभापती अनिल बिसेन, पं.स.सदस्य शामकला गावळ, उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुडेवार, नितेश वालोदे, चिचेवाडाचे सरपंच देवेन्द्र गेडाम, प्रगती शील शेतकरी उत्तम लांजेवार, चिचेवाडा आदिवासी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लटये, उपाध्यक्ष सुरेश निखाडे, संचालक प्रेमलाल पिसदे , मधुकर गावळ, उदाराम औरासे, जीवन भोयर, रमेश फरदे, रामसिंग राठोड, जीवन बडवाईक, गौतम तिरपुडे, उमराव कोसरे, लताबाई मेळे, जयवंताबाई राऊत, सचिव के.सी.गावळ, लिपिक के.एम.घासले यांच्या सह चिचेवाडा, सेडेपार, बेलारगोंदी, लेंडीजोब व धोबीसराड येथील शेतकरी व गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सह उदघाटक संचालक भरतसिंग दुधनांग म्हणाले की, दरवर्षी आपण रब्बी व खरीप आदिवासी संस्थेच्या माध्यमातून आपण धान खरेदी करीत असतो पण यावर्षी थोडा उशीर झाला आहे. कारण की यावर्षी रब्बी धान खरेदीचे उद्दिष्टे आहे ते केंद्र शासनाकडून कमी प्रमाणात आलेले आहे. राज्यशासनाकडून ज्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये धानाचे उत्पन्न होते. त्या पद्धतीचे नियोजन करून राज्य शासना तर्फे केंद्र सरकारला अहवाल योग्य रित्या न पाठवीले आणि उशिरा पाठविल्यामुळे धान खरेदीचे उद्दिष्टे व मर्यादा फार कमी प्रमाणात आले आहे. या साठी आदिवासी महामंडळ मार्फत प्रयत्न सुरू आहे. लवकरच या उद्दिष्टे व मर्यादेत वाढ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे म्हटले.
तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संजय पुराम यांनी म्हटले की, मागच्या वर्षी सुद्धा याच रब्बी हंगामात धान खरेदी संबंधात आदिवासी संस्थेवर शासनाने अन्याय केला होता. शासनाने त्यावेळी ज्या संस्थेजवळ स्वतःचे गोडावून असतील त्याच संस्थेने धान खरेदी करावे असे आदेश काढले होते. त्यावेळी या क्षेत्रातील अनेक संस्थेचे पदाधिकारी माझ्या कडे आले आणि आपली समस्या सांगितले त्यावेळी मी जिल्हाधिकारी यांना भेटून त्या कोरोना काळात सर्व शासकीय आश्रमशाळा बंद होत्या. त्या आश्रमशाळा आदिवासी संस्थेच्या धान खरेदी करिता उपलब्ध करून घ्यावे असी मागणी केली. ही मागणी जिल्हाधिकारी यांनी मान्य करून त्यावेळी सर्व आदिवासी संस्थेला आश्रम शाळेत धान खरेदी करून साठवनुक करण्याची सोय करून दिली. यावेळी मात्र धान खरेदी उद्दिष्टे व मर्यादा ठरवून शासन शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. राज्यशासन केंद्र शासनाकडे बोट दाखविते तर केंद्रशासन राज्यशासनाकडे बोट दाखविते या दोघांच्या कचाट्यात मात्र शेतकरी हा पिसत आहे. असे म्हटले या प्रसंगी सविता ताई पुराम व आशिष मुडेवार यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
या दरम्यान कार्यक्रमात उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे व नवनिर्वाचित लोक प्रतिनिधिचे, सरपंच आणि प्रगती शील शेतकरी यांचे संस्थेच्या मार्फत शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संस्थेचे संचालक प्रेमलाल पिसदे आणि उपस्थितांचे आभार संस्थेचे लिपीक के.एम.घासले यांनी मानले.