प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या बुधवारी 8 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी समाजमाध्यमांव्दारे दिली आहे. त्यामुळे निकाल कधी लागणार याची उत्सुकता संपली असून निकालानंतरच्या जल्लोषाची तयारी विद्यार्थ्यांना सुरू करता येणार आहे.
राज्य मंडळाने यंदा परीक्षा घेण्यावर ठाम राहत दहावी -बारावीच्या परीक्षा घेतल्या. काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल देखील करावे लागले. त्यामुळे दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल तर, बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून तब्बल 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी बसले होते. तर बारावीच्या परीक्षेला 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले होते. बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली. विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांनी सहकार्य केल्याने ही परिक्षा सुरळीत पार पडली. पेपर तपासणीचे कामही व्यवस्थितपणे पार पडले आणि निकाल तयार करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंडळामार्फत देण्यात आली आहे.
या वेबसाईटवर पाहता येईल बारावीचा निकाल
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org