मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील कोपर्यातील जिल्ह्यांमध्ये पूर नियंत्रण समन्वयाने करणार पूर नियंत्रण समिती कार्य
गोंदिया 04: मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील कोपर्यातील जिल्ह्यांमध्ये पूर नियंत्रणाकरिता समन्वय ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या आंतरराज्यीय पूर नियंत्रण समितीच्या बैठकीत आपत्ती व पूर परिस्थितीचा सामना समन्वयाने करण्यावर सहमती दर्शविण्यात आली. दोन्ही राज्यातील सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून येणार्या दिवसांत काम करण्याची ग्वाही या बैठकीत देण्यात आली. विभागीय आयुक्त नागपूर माधवी खोडे-चवरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक घेण्यात आली.
विभागीय आयुक्त जबलपूर, जिल्हाधिकारी शिवणी, छिंदवाडा, बालाघाट, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर हे या बैठकीला उपस्थित होते. जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मान्सून कालावधीत जलसंपदा व जलसंधारण विभागाने धरणातील पाणी साठ्याचे वेळापत्रकानुसार योग्य नियोजन करून पाणी सोडावे. धरणातून पाणी सोडतांना पूर्व सूचना द्यावी. तसेच पाण्याच्या विसर्गाची माहिती संबंधित यंत्रणेला तात्काळ कळवावी. धरणातील पाणी सोडण्यापूर्वी संबंधित विभागांनी नदी पातळीवरील गावांना अगाऊ अवगत करावे. धरणातील पाण्याचा साठा तसेच नदीच्या भागातील कॅचमेंट भागात झालेल्या पावसाचा विचार करून धरणातील पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात यावा. संजय सरोवर धरणाच्या विसर्गाचे पाणी सोडल्यानंतर कोणत्या भागात किती वेळेत पाणी पोहचणार याची माहिती संबंधित विभागांना तसेच नागरिकांना देण्यात यावी, असे बैठकीत ठरले आहे.
धरणाचे पाणी सोडतांना नागरिकांसाठी सोप्या भाषेत संदेश तयार करून ते पोहचवावे जेणे करून नागरिकांना समजण्यास सोपे होईल. मान्सून कालावधीत धारण नियंत्रणाकरिता विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे बाबत संबंधित विभागाला निर्देश देण्यात यावेत. हवामान खात्याद्वारे पावसाचा ईशारा-सूचना अतिवृष्टी इत्यादींची माहिती आंतरराज्यीय ग्रुपवर शेअर करावी तसेच संबंधित अधिकार्यांना व्यक्तिगत भ्रमणध्वनी- दूरध्वनीवरून देण्यात यावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील पूर प्रवण 96 गावांचा विशेष उपाययोजना असलेला आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुकानिहाय नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु ठेवण्याबाबत निर्देशित करण्यात आले. यावर्षी 106 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.