देवरी: रोजगार हमी योजनेच्या कामावरील रोजंदारी काढण्यासाठी 50रु प्रति व्यक्ती द्या, नाही तर कामावरून काढण्याची धमकी !

देवरी 01: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये १०० दिवसांपर्यत रोजगाराची हमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते. बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याबरोबरच शाश्वत मालमत्ता निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. लाभार्थी यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा केली जाते. परंतु देवरी तालुक्यातील सदर कामावर काम करणाऱ्या ग्रामीण मजुरांना त्यांची रोजंदारी काढण्यासाठी चक्क 50रु प्रति व्यक्ती द्या अशी मागणी केली जात असल्याची तक्रार रोहयो कामावरील मजुरांनी केली आहे.

सध्या देवरी तालुक्यात रोहयोची कामे जोरदार सुरु आहेत. ग्रामपंचायत पातळीवर सदर कामे सुरु असून पिंडकेपार ग्रामपंचायत अंतर्गत तलाव खोलीकरण कामावर मजुरांची रोजंदारी काढण्यासाठी हजेरी घेणारे लोक 50रु प्रति व्यक्ती मागणी करीत असल्याचा प्रकार नागरिकांनी माध्यमांना सांगितलं आहे. 50रु न दिल्यास किंवा तक्रार केल्यास कामावरून काढून घेण्यात येणार अशी स्पष्ट ताकीद संबंधितांनी दिली अशी माहिती तक्रारकर्ते मजूर नाव न सांगण्याच्या शर्तीवर प्रसारमाध्यमांना दिली.

मजुरांच्या मेहनतीवर डल्ला मारणारे नेटवर्क तालुक्यात सक्रिय झाले असून रोहयो च्या कामावर मजुरांकडून होणारी वसुली जोरदार सुरु असल्याच्या ग्रामीण भागात चर्चा आहेत. कामावरून काढून देण्याच्या धमकी मुळे मजूर 50रु देत असल्याचे वृत्त आहे. सदर घटनेमुळे ग्रामीण भागात राबविण्याच्या शासनाच्या योजनेवर देखील वसुली करणाऱ्या संबंधितांचे डोळे असल्याचे स्पष्ट होत असून भागातील लोकप्रतिनिधी , अधिकारी यांनी मजुरांच्या हक्काच्या रोजंदारीवर योग्य कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Share