लोकअदालत मध्ये 189 प्रकरणे निकाली
गोंदिया 15,(जिमाका) वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबीत असलेले खटले समोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली निघावी यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे यांचे मार्गदर्शनाखाली 12 डिसेंबरला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये सर्वच प्रकारच्या तडजोडपात्र न्याय प्रविष्ठ व पुर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणाकरीता तसेच विद्युत व बँक लोकोपयोगी पुर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांकरीता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यात एकूण न्यायालयात प्रलंबीत दिवाणी 224 प्रकरणांपैकी 17 प्रकरणे निकाली काढण्यात आली व 48,94,615 रुपयांची वसुली करण्यात आली. न्यायालयात प्रलंबीत 905 फौजदारी प्रकरणांपैकी 93 प्रकरणे निकाली काढण्यात आली व 61,12,240 रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच पुर्वन्यायप्रविष्ठ 2426 प्रकरणांपैकी 79 प्रकरणे निकाली काढण्यात आली व 29,20,239 रुपयांची वसुली करण्यात आली. असे एकूण 3555 ठेवलेल्या प्रकरणांपैकी 189 प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला व 1,39,27,094 रुपयांची वसुली करण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाली. यामुळे बऱ्याच पक्षकारांनी समाधान व्यक्त केले आहे. या लोक अदालतीची विशेष बाब म्हणजे विद्युत, पाणी, टेलिफोन यांचे पुर्वन्यायप्रविष्ठ प्रकरणातील ज्या पक्षकारांनी तडजोडीप्रमाणे थकबाकीची पूर्ण रक्कम संबंधित विभागाला जमा केली त्यांची प्रकरणे कायमची संपवण्यात आली. यामुळे संबंधित विभाग व थकबाकीदारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च व मानसिक त्रास वाचला.
न्यायालयात प्रलंबीत असलेली प्रकरणे तसेच पुर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याकरीता गोंदिया येथे न्यायाधीश सर्वश्री एस.बी.पराते, एस.जे.भट्टाचार्य, एन.आर.वानखडे, जे.एम.चौहाण, श्रीमती आर.डी.पुनसे, व्ही.आर.आसुदानी, व्ही.आर.मालोदे, पी.सी.बछले यांनी तसेच पॅनलवरील वकील श्रीमती ज्योती भरणे, मंजुलता चतुर्वेदी, वैशाली उके, नीना दुबे, सुनिता चौधरी, दर्शना रामटेके, मंगला बंसोड, कौशल्या खटवाणी तर सामाजिक कार्यकर्ते सविता बेदरकर, मधुकर नखाते, सविता तुरकर, आशा ठाकुर, संगिता घोष, रविंद्र बडगे, माधुरी नासरे, रजनी रामटेके यांनी सहकार्य केले. लोकअदालतीचे यशस्वी आयोजनाकरीता न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केला.