५ महिन्यात जिल्ह्यात ४५ मोटारसायकल लंपास

पोलिसांपुढे दुचाकी चोरट्यांचे आवाहन कायमच

गोंदिया जिल्ह्यात भुरट्या चोरांचा शुकशुकाट वाढत चालला आहे. त्यातल्यात्यात दुचाकी चोरट्यांची जणु टोळीच सक्रिय असल्याची बाब विविध पोलिस ठाण्यात नोंद होत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांवरून समोर येवू लागली आहे. सन २०२२ च्या साडेचार महिन्यात एकूण ४५ मोटारसायकल चोरी झाल्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्हा पोलिसांपुढे दुचाकी चोरट्यांचे आवाहन कायमच आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. दर दोन दिवसात एक मोटारसायकल चोरी होत आहे. यामुळे जिल्ह्यात मोटारसायकल चोरीकरणाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याचे प्रत्यय येवू लागले आहे. शहरी क्षेत्रापासून ग्रामीण भागापर्यंत चोरटे सक्रिय आहेत. रेल्वे स्थानक, बसस्थानक, लग्न मंडप, बँक परिसर, मंदिर हे सार्वजनिक ठिकाण चोरट्यांच्या रडारवर आहेत. सन २०२२ च्या अवघ्या साडेचार महिन्यात जवळपास ४५ दुचाकी लंपास झाल्याची नोंद विविध पोलिस ठाण्यात आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात ११, फेब्रुवारी महिन्यात ८, मार्च महिन्यात १७ एप्रिल महिन्यात १३ तर मे महिन्याच्या २० तारखेपर्यंत ५ दुचाकी लंपास झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. तर दुसरीकडे दुचाकी चोरट्यांनी देखील पोलिसांपुढे आवाहनच उभे केले आहे. उल्लेखनिय असे की, गोंदिया पोलिसांनी अनेक तपासकार्यातून दुचाकी चोरट्यांना कारागृहात डांबले आहे. असे असले तरी दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये काही कमी येताना दिसून येत नाही.

१२० घटनात ७४ लाखाहून अधिकचा माल चोरी:

मोटारसायकल चोरीच्या घटनांबरोबर घरफोडी, किरकोळ चोरी, वाहन लंपास अशा अनेक चोरीच्या घटनांचाही आलेख काही कमी होताना दिसून येत नाही. गेल्या साडेचार महिन्यात गोंदिया जिल्ह्यात जवळपास १२० चोरीच्या घटना नोंद झाल्या आहेत. या घटनातून चोरट्यांनी ७५ लाखाहून अधिकचा मालावर हातसाफ केले आहे. यातील अनेक चोरीच्या घटना गोंदिया पोलिसांकडून उघड करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक घटनातील चोरीचा माल किंबहुना चोरीचे प्रकरण फाईलबंद झाले आहेत. हे कटुसत्य देखील गोंदिया पोलिसांना पचविणे कठीण जात आहे.

Share