23 मे ते 4 जून कालावधीत जिल्हाभरात बीज प्रक्रिया मोहिम

गोंदिया,दि.11 : जिल्ह्यात विविध योजनेअंतर्गत सन 2022-23 अंतर्गत भात पीक प्रात्यक्षिके तसेच बियाणे वितरण कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये बीज प्रक्रियेचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यानुषंगाने खरीप हंगामात दिनांक 23 मे ते 4 जून 2022 या कालावधीत जिल्ह्यामध्ये बीज प्रक्रिया मोहिम राबविण्यात येत आहे. सर्व भात बियाणांना 3 किलो मीठ 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बी ओतावे व ढवळावे. द्रावणावर तरंगणारे बी बाहेर काढून जाळावे. तळाशी असलेले जड बी बाहेर काडून स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे. यामुळे अरगट, काणी या रोगापासून संरक्षण करता येते. बुरशीजन्य रोगासाठी 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास थारयम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिमची बीज प्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरण व स्फुरद उपलब्धतेसाठी ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पी.एस.बी.) प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यास चोळावे व अर्धा तास सावलीत सुकवावे. जिवाणु संवर्धनाची बीज प्रक्रिया फायदेशीर ठरते. या जैविक बुरशी नाशकाची बीज प्रक्रिया उपयुक्त असल्याने मोहिमेमध्ये सहभाग घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीकरीता तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Print Friendly, PDF & Email
Share