मानव विकास निर्देशांक वाढीसाठी रोजगार निर्मितीवर भर द्या
मानव विकास आयुक्त नितीन पाटीलयोजनांचा घेतला आढावा

PraharTimes
गोंदिया, दि.19 : मानव विकासाच्या योजना व कार्यक्रम राबवितांना मानव विकास निर्देशांक वाढीसाठी विविध क्षेत्रातील रोजगार निर्मितीवर भर देण्यात यावा अशा सूचना मानव विकास आयुक्त नितीन पाटील यांनी दिल्या. शिक्षण, आरोग्य आणि अजीविका या तीन मापदंडावर काम करावे असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, उपवनसंरक्षक पवन जप्स, जिल्हा नियोजन अधिकारी मानव विकास एस.बी. पाचखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मानव विकास कार्यक्रम राबविणाऱ्या सर्व विभागाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. शिक्षण, आरोग्य आणि अजीविका या तीन घटकांवर आधारित मानव विकास कार्यक्रम असून या अनुषंगाने प्रत्येक विभागाने नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण विभागाकडून 8 ते 12 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सायकल वाटप योजना राबविली जाते. मानव विकासाचे तिन्ही इंडिकेटर पूर्ण करणारी ही योजना असून 8 ते 12 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त मुलींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थी मुलींची यादी तात्काळ सादर करावी असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मानव विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्याला एक बस देण्यात आली आहे. या बसच्या मार्गाचा आराखडा तयार करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व गरीबातील गरीब व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम राबविण्यात यावा असे ते म्हणाले. शिक्षणातील मागासलेपणा दूर करण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाचा उपयोग करावा असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य व गरीब व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासोबतच रोजगार निर्मिती हा उद्देश ठेवून नियोजन करावे असे पाटील म्हणाले.
कृषी क्षेत्रात सुद्धा उत्पन्न वाढीसोबतच मूल्यवर्धन हा उद्देश ठेवावा. कौशल्य विकासाची जोड दिल्यास जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे त्यांनी नमूद केले. आरोग्य विभागाचा आढावा घेतांना पाटील म्हणाले की, गरोदर व स्तनदा माता यांची तपासणी मोहीम व शिबीर नियमितपणे आयोजित करण्यात यावेत. इको टुरिझम, होम स्टे, टूरिस्ट गाईड, सोलर फेंसिंग अशा योजना राबवून वनविभागाने मानव विकास कार्यक्रम यशस्वी करावा. जंगल हे रोजगार निर्मितीचे केंद्र असून महुआ, चारोळी संकलन यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासोबतच मत्स्यव्यवसाय, उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ, एस टी महामंडळ यासह विविध विभागाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
00000

Print Friendly, PDF & Email
Share