पेंच व्याघ्र प्रकल्पात आता रात्रीचे वनपर्यटन

नागपूर- पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बफर झोन म्हणून समाविष्ट असलेल्या नागलवाडी व पवनी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्रामध्ये आता रात्रीचे पर्यटन सुरू होणार आहे. येत्या १७ मेपासून प्रायोगिक तत्त्वावर हे वनपर्यटन सुरू करण्याबाबतचा निर्णय झाला आहे.
पवनी आणि नागलवाडी या दोन्ही ठिकाणी रात्री ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत रात्र गस्त आणि सायंकाळी ६ ते सकाळी ५ वाजेपयर्ंत मचानावर रात्रीच्या निसर्गानुभवाची संधी आहे. यासाठी दोन मचान उपलब्ध असतील. यासोबतच चोरबाहुली, खुर्सापार, सिल्लारी आणि नागलवाडी येथे सकाळी ६.३0 ते सायंकाळी ६.३0 अशी संपूर्ण दिवसांची सफारी असणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, पेंच व्याघ्र प्रकल्पात ४८३.९६ चौ. कि.मी. क्षेत्र बफर झोन म्हणून समाविष्ट झाले आहे. या बफर झोनमधील २0२ चौ. कि.मी. क्षेत्राकरिता नागलवाडी व पवनी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्र आहे. अर्थात, हे क्षेत्र वन्यजीव अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानाचा भाग नाही. परिणामी, या ठिकाणी असलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी पेंच प्रकल्पाने हा उपक्रम सुरू केला आहे. परंतु, हे पर्यटन करताना अटी आणि नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे. येथे पर्यटनाला आल्यानंतर काय करावे काय करू नये, यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना रात्रीचे वनपर्यटन सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांनी दिली. बफर क्षेत्र असल्याने या क्षेत्रात अवैध वृक्षतोड, शिकार, अवैध चराई, आदी समस्या आहेत. या रात्रीच्या पर्यटनामुळे वनसंरक्षणाला चालना मिळणार आहे. पर्यटकांना निसर्गानुभव देण्यासोबतच वनसंरक्षणाच्या कामात स्थानिकांना रोजगार उपलब्ध निर्माण करून देण्यासाठी या दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला जात आहे.

Share