10 जूनपर्यंत बारावीचा तर 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल, तालुक्यातील विद्यार्थी निकालासाठी उत्साही

मुंबई 09 : “दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल,” अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असं बोर्डाने म्हटलं. त्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. याअंतर्गत बहुतांश परीक्षांची पहिली शिफ्ट सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत सुरु होती. तर दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी 3 ते 6.30 अशी होती. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या. राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

Print Friendly, PDF & Email
Share