गोंदिया जिल्हा परिषदेवर कुणाची सत्ता? समीकरणाचे सूत्र कुणाकडे ?

प्रहार टाईम्स वृत्तसंकलन

गोंदिया 08: मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा मुहुर्त ठरला असून 10 मे रोजी होणार्‍या जिप अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसले तरी भाजप सत्ता स्थापनेचा प्रमुख दावेदार आहे. 53 सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपचे 26 सदस्य आहेत. भाजपाला बहुमतासाठी एका सदस्याची गरज आहे. सत्ता स्थापनेची सर्वच समिकरणे ठरली आहेत. दोन अपक्ष (भाजप बंडखोर) सदस्यांच्या सहकार्याने गोंदिया जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप बहुमताच्या एक हात दूर आहे. पक्षांतर्गत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा परिषदेतील भाजपचे जिप सदस्य हैदराबाद येथे सहलीला गेले असल्याची माहिती आहे. ऐन वेळेवर फाटाफुट होऊ नये, यासाठी निवडणुकीच्या एक दिवसाआधी अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याचा निर्णय नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपस्थितीत घेण्यात येणार असल्याचे सांगीतले जात आहे. यामुळे सध्या तरी भाजप कार्यकर्ते संभ्रमात आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लायकराम भांडारकर, डॉ. लक्ष्मण भगत, संजय टेंभरे तर महिलांमधून रचना गहाणे, सविता पुराम, कविता रंगारी यांना प्रबळ दावेदार समजण्यात येत असले तरी ऐनवेळी भाजप पक्षश्रेष्ठी कुठला निर्णय घेतील, हे सांगता येणे शक्य नसल्याने जिप सदस्यांचा गट वेगळा फुटू नये म्हणून भाजप पूर्ण खबरदारी घेत आहे. जिल्ह्यातील भाजप वर्तुळात माजी मंत्री राजकुमार बडोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या सर्व बाबीला अनुसरून, तसेच पक्षांतर्गत गटबाजी लक्षात घेऊन यावेळी अध्यक्षपदासाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, हे निश्चित नाही.

यातील डॉ. लक्ष्मण भगत, संजय टेंभरे यांचा अध्यक्षपदासाठी विचार झाला नाही, तर उपाध्यक्षपदासाठी नक्कीच यापैकी एकाचा विचार होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांची नावे ठरल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतीची नावे ठरणार असली तरी यासाठीही आतापासून मोर्चेबांधणी सुरू झाली असल्याचे सांगीतले जात आहे. 53 सदस्यीय गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये भाजप 26, काँग्रेस 13, राष्ट्रवादी 8, चावी संघटन 4 आणि अपक्ष 2, असे पक्षीय बलाबल आहे. विशेष म्हणजे दोन्ही अपक्ष पौर्णिमा उमाकांत ढेंगे आणि सोनू उर्फ रुपेश कुथे हे भाजपाचे बंडखोर विजयी उमेदवार आहेत. यांची मनधरणी झाली असून यांच्या सहकार्याने भाजप जिल्हा परिषदेमध्ये पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे भाजपला सत्तेपासून दूर सारण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या धरतीवर काँग्रेस-राष्ट्रवादी, चावी संघटन आणि अपक्ष उमेदवार मिळून सत्ता स्थापन करणर असल्याची चर्चा आहे.

Share