जिल्हातिल प्रकल्पांत फक्त 18 टक्के जलसाठा

देवरी 07: तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून बाष्पीभवन व अति वापरामुळे प्रकल्पातील जलसाठयात झपाट्याने घट होत आहे. सद्यस्थितित जिल्ह्यातील 69 प्रकल्पात 18.67 टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या तारखेला 21.66 टक्के साठा होता. 3 टक्के साठा कमी आहे. दरम्यान उपलब्ध जलसाठ्यावर एक ते दीड महिना जिल्ह्याची तहान भागवावी लागणार आहे.

मागील दोन वर्षांत जिल्ह्यात समाधानकारक पाउस झाला आहे. पावसाळ्यात अनेक प्रकल्पांनी शंभरी गाठली होती. इतर छोटी मोठी धरणे देखील पाण्याने लबालब भरली होती. मोठया धरणातून विसर्ग सुरु होता. त्यामुळे यंदा मे महिना उजाडला तरी धरणांत समाधानकारक जलसाठा होता. परंतु आता उन्हाची दाहकता वाढत आहे. अनेक भागांत नदी, नाले व ओढे कोरडे पडले आहेत. विहिरिंनी तळ गाठला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात वस्ती व वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे सर्वत्र पाण्याची मागणी वाढते आहे. मध्यंतरी अनेक धरणांतून शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर देखिल सुरु आहे.

एकूणच धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. आज स्थितीत जिल्ह्यातील 9 मध्यम प्रकल्पांमध्ये 15.71, 22 लघु प्रकल्पांत 21.75, 38 मामा तलावांत 20.51 टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच तारखेला अनुक्रमे 22.76, 21.85, 16.54 टक्के साठा शिल्लक होता. हवामान खात्याने यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा दहा दिवस पूर्वी येणार असे, शुभवर्तमान वर्तवले आहे. पण जूनच्या मध्यान्हांत हजेरी लावल्यानंतर पाऊस दडी मारतो हा अलीकडचा अनुभव आहे. हा लहरीपणा लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्यावर दीड ते दोन महिने जिल्ह्याची तहान भागवावी लागणार आहे. त्यामुळे काटकसरिने पाणी वापरण्याचे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share