मन सुन्न करणारी घटना: त्या अपघातातील आई व दोन मुलांवर एकाच सरणावर अंतिम संस्कार

◼️घरतोडा (मासळ) गावात शोककळा

मासळ, (दि. 6 मे): राष्ट्रीय महामार्गावर डुग्गीपार ता. सडक अर्जुनी येथे दि. 5 मे च्या सायं. 7 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात जिल्हा परिषद शाळा देऊळगाव केंद्र चिचगड येथे कार्यरत शिक्षक तुलसीदास मेश्राम यांच्या कुटुंबातील पत्नी व दोन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. आज त्यांचे एकाच ठिकाणी मुळगाव घरतोडा/मासळ येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी संपूर्ण घरतोडा गाववासी यांचे अश्रू अनावर झाले असल्याचे दिसून आले.

शिक्षक तुळशीदास रामा मेश्राम (रा. घरतोडा ता. लाखांदूर जि. भंडारा) हे आपल्या परिवाराला घेऊन भंडारा वरून देवरीकडे दुचाकीने जात असतांनी भरधाव ट्रक ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नी प्रीती तुलसीदास मेश्राम (33), मुलगा कृष्णा (12) व चिन्मय(6) असे तिघेही जण जागीच ठार झाले. तर शिक्षक मेश्राम हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.

शिक्षक मेश्राम यांचे संपुर्ण कुटूंबच अपघातात मृत झाल्याने संपूर्ण घरतोडा परिसरात तसेच गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक
परिवारात शोककळा पसरली आहे. दोन्ही मुले व आईवर घरतोडा येथे एकाच सरणावर अंतिम संस्कार केले गेले. त्यावेळी उपस्थित सर्व गावकरी व मित्र परिवार यांना अश्रू अनावर झाले. गाव परिसरात अशी दुःखद घटना यापूर्वी घडली नसल्याचे गावकरी बोलत होते.

शिक्षक नेते किशोर डोंगरवार, संदीप तिडके व शिक्षक मित्रांनी केले शर्थीचे प्रयत्न व मदत:
अपघात झाल्यानंतर अपघाताची बातमी कळताच सडक अर्जुनी येथील शिक्षक किशोर डोंगरवार, संदीप तिडके, ललित फुंडे, सुभाष कठाने व डी. के. मेश्राम हे तात्काळ ग्रामीण रुग्णालयात पोहोचले व गंभीर जखमी तुलसीदास मेश्राम यांना तातडीने गाडीने नागपूर येथे घेऊन गेले. रात्रभर त्यांच्या सोबत राहून उपचाराची व्यवस्था केली व पुन्हा आज सडक अर्जुनी येथे पोहचून ग्रामीण रुग्णालयात असलेल्या तिन्ही शवाचे शव विच्छेदन लवकर करण्यासाठी पोलिसांशी व डॉक्टरांशी संपर्क करून सहकार्य केले. त्यानंतर तिन्ही शव घेवून श्री मेश्राम यांचे मुळगाव घरतोडा येथे पोहचले व अंतिम संस्कारात सहभागी झाले. किशोर डोंगरवार व त्यांच्या शिक्षक मित्रांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे श्री मेश्राम यांना नागपूर ला आल्याने त्यांचे प्राण वाचण्याची शक्यता बळावली आहे. शिक्षकांप्रती असलेल्या आपुलकी व स्नेहामुळेच ते गोंदिया जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष असल्याचे उपस्थित शिक्षकांनी सांगितले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share