तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात

Ramtek : अपर तहसिल कार्यालय, देवलापार, ता. रामटेक जि. नागपूर येथील जमिल सरवर शेख, वय ४० वर्ष, पद – तलाठी, यांनी ७,००० /- रूपयांची लाच रक्कम स्विकारल्याने ॲन्टी करप्शन ब्युरो, नागपूरच्या पथकाने कारवाई केली..
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार यांचे वडीलांचा सन २०२० मध्ये कोरोना संसर्गाने निधन झाल्याने त्यांचे नावावर असलेले मौजा देवलापार येथील घर नं. ४९२, वार्ड नं. ३ चे ७/१२ चे पत्रकावर वारस म्हणुन आई तसेच तक्रारदार व बहीणींची नावे समाविष्ठ करणे असल्याने ७/१२ पत्रकाची गरज होती. त्याकरीता तक्रारदार मौजा देवलापार येथील तलाठी कार्यालयात कागदपत्रांची मागणी करणे करीता तसेच फेरफार नोंदणी व वारस नोंदणी करणे करीता गेले असता कार्यालयात हजर असलेले तलाठी जमिल सरवर शेख यांना भेटुन सदर कामाबाबत सांगितले.तलाठी जमिल सरवर शेख यांनी तक्रारदार यांना सांगितले की, कार्यालयात त्यांचे वडीलांचे नावाचे मालमत्तेची नोंदणी असलेले जुने रेकॉर्ड मिळुन येत नाही, म्हणुन तक्रारदार यांना त्यांचे वडीलांचे नावावर असलेली घराची रजिस्ट्री व एखादा जुना ७/१२ पत्रकाची प्रत आणि १०.०००/- रू. आणुन द्या, मी तुमचे काम करून देतो असे सांगितले. परंतु तक्रारदार यांना ७/१२ पत्रकावर वारसांची नावे समाविष्ठ करण्याकरीता तलाठी जमिल सरवर शेख यांना १०,०००/- रु. लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे प्रत्यक्ष येवून तक्रार नोंदविली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक शिवशंकर खेडेकर, ला.प्र.वि. नागपूर यांनी तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता पडताळणी दरम्यान तलाठी जमिल सरवर शेख, तलाठी कार्यालय, देवलापार, जि. नागपूर यांना तक्रारदार यांनी ७/१२ पत्रकाची प्रत दिसुन येत नाही, वडीलांचे नावावर असलेली घराची रजिस्ट्रीच आहे असे सांगितले असता, तलाठी जमिल सरवर शेख यांनी ७/१२ पत्रकाशिवाय काम होणार नाही त्याकरीता १०,०००/- रू. खर्च येईल असे तक्रारदार यांना सांगितले. तडजोडअंती कार्यवाही दरम्यान तलाठी जमिल सरवर शेख यांनी ७/१२ पत्रकावर वारसांची नावे समाविष्ठ करण्याकरीता ७,००० /- रू. कार्यालयाचे आवारात स्वतः स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडले. त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन, देवलापार, जि. नागपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक मधुकर गिते, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिवशंकर खेडेकर, पोहवा अशोक बैस, राम शास्त्रकार, नापोशि भागवत वानखेडे, चालक स.फौ. वकील शेख सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांनी केलेली आहे.

Share