गोंदियातील शेतकर्यांवर 29183.51 लाखांचे पीककर्ज थकीत
गोंदिया: शेतकर्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमार्फत उद्दिष्टापेक्षा जास्त पीककर्जाचे वाटप करून शेतकर्यांना आर्थिक हातभार लावला जातो. आज स्थितीत जिल्हा बँकेचे शेतकर्यांवर चालू व मागील थकीत रक्कम तब्बल 29183.51 लाख रुपयांचे पीककर्ज थकीत आहे. 31 मार्च अखेरपर्यंत 14557.28 रुपयांची वसुली झाली आहे. वसूलीची टक्केवारी 30 आहे.
कोणत्याही व्यवसायासाठी भांडवलाची गरज असते. ही गरज शासन व बँकांमार्फत पूर्ण केली जाते. शेतकर्यांनाही शेतीसाठी विविध बँकांच्यामार्फत पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकर्यांना गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखा अंतर्गत पीक कर्जाचे वाटप केले जाते. सन 2021-22 या खरीप हंगामात जिल्हा बँकेच्या 31 शाखांच्या 329 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्यामार्फत पीक कर्ज वितरित केले. मार्च 2022 पर्यंत एकूण 29183.51 लाख रुपयांचे पीककर्ज थकीत आहे. पैकी केवळ 14557.28 रुपयांची वसुली मार्च अखेरपर्यंत झाली. कर्ज वसुलीची टक्केवारी केवळ 30 एवढी आहे. एप्रिल महिन्यापासून खरीप हंगामाच्या पीक कर्ज वाटपाला सुरुवात होते. तत्पूर्वी 31 मार्च अखेरपर्यंत पीककर्जाची परतफेड करणारे शेतकरीच पुढील हंगामासाठी पीककर्ज घेण्यास पात्र ठरतात. मात्र 70 टक्के farmers शेतकरी कर्ज वेळेत न भरू शकल्याने त्यांच्यावर पीककर्जापासून वंचीत राहण्याची वेळ निर्माण झाली आहे. येत्या खरीप हंगामासाठी कर्ज घेण्यासाठी शेतकर्यांनी पीक कर्जाची परतफेड करून जिल्हा बँकेला सहकार्य करण्याचे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश टेटे यांनी केले आहे.
दशकभरात तीनदा कर्जमाफी
शेतकर्यांवर नेहमीच नापिकीचे दुष्टचक्र ओढावते. यातून सावरण्याचा शेतकरी प्रयत्न करीत असले तरी ते नियतीपुढे हतबल ठरतात. वेळप्रसंगी त्यांच्यावर आत्महत्येची नामुष्कीही येते. सततच्या संकटांमुळे शेतकर्यांवर कर्जाचे डोंगर उभे होते. यातूनच शेतकर्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची मागणी पुढे येते. गत दशकभरात शासनाने तीनदा शेतकर्यांना कर्जमाफी दिली. यात सन 2009, 2017 आणि 2019 या काळात शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात आली. मात्र आजही शेतकर्यांच्या आर्थिक स्थितीत फारसा बदल जाणवत नाही.