पेट्रोल पंपावर केक कापून इंधन दरवाढीचा निषेध

गोंदिया: केंद्र शासनाने लागू केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने शहरातील शेंडेबंधू पेट्रोलपंपासमोर शुक्रवार, 1 रोजी केक कापून आंदोलन केले.

यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, माजी नगरसेवक सचिन शेंडे, सुनिल भालेराव, शंकर टेंभरे, शैलेश वासनिक, कान्हा बघेले, बालु कोसरकर, रमन उके, सौरभ गौतम, एकनाथ वहिले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधानांनी दाखविलेले अच्छे दिनचे स्वप्न पार धुळीस मिळवले असून वारंवार होणारी इंधन दरवाढ सर्वसामान्यांसाठी अडचणीत ठरू लागली आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीची कामेही ठप्प होऊ लागली आहेत.

शासनाने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा दिवस एप्रिल फुल असे फलक घेऊन त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. केंद्र शासनाने इंधन दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास राज्यभरात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Share