मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतून मिळणार जिल्हात रोजगार

गोंदिया: मजुरांना त्यांच्या गाव परिसरातच काम मिळावे या उद्देशाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत प्रस्तावित पांदन रस्त्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाने मातोश्री ग्राम समृद्धी योजने अंतर्गत 2022-23 या वर्षात 103 पांदण रस्त्याच्या कामांना मान्यता प्रदान केली आहे. या माध्यमातुन जिल्ह्यातील हजारो मजुरांच्या रोजगाराचा मार्ग सुकर झाला आहे.

विशेष म्हणजे यासाठी राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी राज्याशासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्याच्या नियोजन विभागाने 29 मार्च रोजी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदण रस्त्यातर्गत जिल्ह्यातील 103 पांदण रस्त्यांच्या कामांना मान्यता प्रदान केली आहे. हि कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत करण्यात येणार आहे. मान्यता प्राप्त पांदण रस्त्याच्या माध्यमातून प्रति 1 किमी या प्रमाणे 103 किलोमीटरचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात गोंदिया तालुक्यातील 46 पांदण रस्ते, तिरोडा 10, गोरेगाव 12, आमगाव 1, सडक अर्जुनी 12, सालेकसा 1, देवरी 3 व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 9 पांदण रस्त्यांचा समावेश आहे. या पांदण रस्त्यांमुळे शेतकर्‍यांना शेतीची साहित्ये ने- आन करण्याकरिता सोयीस्कर होणार आहे. तसेच या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो मजुरांना काम मिळणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share