शेतकर्‍याची मुलगी झाली पीएसआय

गोंदिया: परिस्थितीही कितीही विपरित असली तरी अफाट जिद्द, काटेकोर नियोजन, व्यवस्थित व्यवस्थापन व दृढनिश्चय असला की यश हमखास मिळते. मग ते कोणतेही क्षेत्र असो. याच बळावर आता स्पर्धा परीक्षांमध्ये शहरी विद्यार्थ्यांच्या सोबतच ग्रामीण भागातील अगदी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी यश संपादन करत आहेत. शहराजवळील कुडवा येथील चहा विक्रेता तथा अत्यल्पभूधारक शेतकरी कन्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. प्रीती सुरेश पटले असे तिचे नाव आहे.

प्रीती पटले या शेतकरी कन्येने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन 2019 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत 216 गुण मिळवत ओबीसी प्रवर्गातून राज्यात 17 वा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून या प्रीतीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रीती पटलेचे वडील सुरेश व आई गीता पटले अल्पभूधारक शेतकरी दांपत्य आहे. वडीलांचे शिक्षण सातवी तर आईचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. दीड एकर शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांनी शहराजवळच तिरोडा मार्गावर चहाचे दुकान लावले आहे. प्रीतीला लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार व जिद्दी आहे. तिचे प्राथमिक शिक्षण कुडवा येथे तर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण गोंदिया येथे झाले. पदवी व पदव्युत्तर शिक्षण त्यांनी खाजगी नोकरी करून पूर्ण केले. यशवंतराव मुक्त विद्यापीठाची बीए पदवी तर राज्यशास्त्रात नागपूर विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

प्रशासकीय अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. यासाठी खाजगी नोकरी सोडून तिने सन 2017 पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. प्रितींच्या आईवडिलांना या परीक्षाबद्दल अधिक माहिती नव्हती. परंतु त्यांनी प्रितीला पूर्ण स्वायत्तता दिली. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचे शिकवणी वर्ग वा मार्गदर्शन नसतानाही ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियोजनपूर्वक अभ्यास केला. 2019 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 25 मार्च रोजी जाहीर झाला. ही परीक्षा प्रीतीने 216 गुणांसह यशस्वीरित्या उत्तीर्ण केली असून ओबीसी प्रवर्गात महाराष्ट्रातून सतरावा क्रमांक पटकावला. यापूर्वी खामगाव तालुक्यातील कातुर्ली या खेडेगावातील मोसमी कटरे हिने गतवर्षी पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण केली होती. प्रीती ही पोवार समाजातील दुसर्‍या पोलिस महिला अधिकारी होणार असून त्यांच्यावर सर्व स्तरावर करून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतींनी प्रशासकीय सेवेसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व संयमाने पुढे जावे. अभ्यासासाठी मोबाईल, इंटरनेट आवश्यक आहे. मात्र, अभ्यास करताना सोशल मीडियापासून दूर राहिले तर बरे. समाजात मुलगी वयात आल्यावर प्रत्येक आईवडीलांना मुलींच्या लग्नाची घाई होते. अशी घाई माझ्या आईवडीलांनाही होती. मात्र, माझे स्वप्न त्यांना सांगितल्यावर त्यांनी ते पूर्ण करण्यासाठी मला पाठींबा व प्रोत्साहन दिले. त्यामुळे मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आईवडीलांनी त्यांना प्रोत्साहन देऊन लग्नाची घाई न करण्याचा मानसही प्रीतीने व्यक्त केला.

Print Friendly, PDF & Email
Share