पंजाब सर करण्याचा “आप’चा मास्टर प्लॅन
6 राज्यांमध्ये निवडणूक प्रभारी नियुक्त करणार
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूक 2024मध्ये होणार असली तरी आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती तयार करायला सुरुवात केली आहे. अलीकडेच पंजाबमध्ये घवघवीत यश मिळविलेला आम आदमी पक्षदेखील संपूर्ण तयारीनिशी कॉंग्रेसला मागे टाकून भाजपला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, आपने सध्या 2024ची लोकसभा निवडणूक नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यांमध्ये आपले कॅडर तयार करण्यावर भर दिला आहे.
पंजाबमधील आपच्या ऐतिहासिक विजयाला दोन आठवडेही पूर्ण झाले नसताना पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकींसाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. आपने 6 राज्यांमध्ये निवडणूक प्रभारी नियुक्त केले आहेत. हे प्रभारी पक्षाच्या प्रचार कार्यात गुंतलेले आहेत. दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन हिमाचलमध्ये तळ ठोकून आहेत, तर मंत्री गोपाल राय छत्तीसगडमध्ये विजयी यात्रा काढत आहेत.
पंजाब निवडणुकीत कुशल रणनीतीकार म्हणून उदयास आलेले आयआयटीचे प्राध्यापक संदीप पाठक यांच्याकडे आता भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातला तोडण्याचे काम देण्यात आले आहे. दुसरीकडे, सौरभ भारद्वाज हरियाणामध्ये नव्याने पक्षाची बांधणी करत आहेत. आपचे उद्दिष्ट भाजपच्या तुलनेत थेट कॉंग्रेस असलेल्या राज्यांमध्ये कॉंग्रेसची जागा घेण्याचे आहे.
अन्य राज्यांतही करणार प्रसार
आप पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत पंजाबमधील विजयामुळे पाठबळ मिळाले आहे. ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे, त्या राज्यांमध्ये प्रवेश करण्याचे “आप’चे लक्ष्य आहे. गुजरात आणि छत्तीसगडमध्ये पक्ष या रणनीतीवर जोर देत आहे. त्याचबरोबर हिमाचल आणि हरियाणा या पंजाबशेजारील राज्यांतही पक्षाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आपच्या सूत्रांनी दिली.