क्षयरोग निर्मूलन करा – आयुष्य वाचवा : डॉ सुवर्णा हुबेकर
गोंदिया 23 : क्षयरोग निर्मूलनासाठी गुंतवणूक करा, आयुष्य वाचवा’ या यंदाच्या जागतिक क्षयरोग दिन 2022 च्या संकल्पनेवर आधारित एक चर्चा सत्राचे आयोजन 23 मार्च रोजी बी जी डब्लू रुग्णालयात केले होते. दरवर्षी जागतिक क्षयरोग निर्मूलन सप्ताह आयोजित केला जातो. याचा उद्देश या रोगाबद्दल जनजागृती करणे आहे, म्हणून या क्षयरोग आरोग्यसंगोष्टी मध्ये तज्ञ वक्ते म्हणून बाल रोगतज्ञ डॉ.सागर सोनारे, रेडीओलॉजिस्ट डॉ.अनिल परियाल, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, समाज सेवी इंजि. शिखा पिपलेवर, डाएटीशीयन स्वाती बनसोड यांनी यात भाग घेतला. या संगोष्टी मध्ये क्षयरोगाबद्दल माहिती उपस्थित परिचर्या प्रशिक्षणार्थींना दिली.
या चर्चसत्रात डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की, क्षयरोग हा मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो, जो बहुतांशवेळा फुफ्फुसांवर परिणाम करतो. संक्रमीत व्यक्तीच्या खोकल्याच्या थेंबांतून हा रोग सहज पसरू शकतो, ज्यामुळे हा आजार अतिशय संसर्गजन्य बनतो. वेळेत उपचार न झाल्यास क्षयरोग जीवघेणाही ठरू शकतो. जगात क्षयरोग होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात दिसून येतात, ज्यापैकी 26% पेक्षा जास्त रुग्ण भारतात आढळून येतात. जगातील एकूण रुग्णांच्या एक चतुर्थांश रुग्ण भारतात आढळून येतात, ज्यात बहुऔषधे प्रतिरोध क्षयरोग तसेच एचआयव्ही क्षयरोग देखील आहेत.
“जगातील एक तृतीयांश लोकांमध्ये क्षयरोगाचे संक्रमण असते – याचा अर्थ असा नाही, की ते सगळे क्षयरोगी आहेत. भारताच्या 40% पेक्षा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जीवाणू असतात, पण त्यांना क्षयरोगाचे संक्रमण झालेले नसू शकते. यापैकी केवळ 10% व्यक्तींना क्षयरोग होणाची शक्यता असते,”असे डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले.
खालावलेली रोगप्रतिकार शक्ती हे क्षयरोग होण्याचे एक सर्वसामान्य कारण समजले जाते, ज्यामुळे क्षयरोग संक्रमण हे क्षयरोगात परिवर्तीत होते. एचआयव्ही, तणाव, मधुमेह, फुफ्फुसांचा आजार असलेले लोक, मद्यपान करणारे लोक, धुम्रपान करणारे लोक ज्यांची एकूणच प्रकृती खालावलेली असते अशा लोकांना क्षयरोग होण्याची अधिक शक्यता असते. या एकंदर प्रतिकारशक्ती कमी असलेल्या टप्प्यावर या गटातील लोकांमध्ये लक्षणे दिसू लागतात. एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे क्षयरोग आणि एचआयव्ही रुग्णांमध्ये सर्वात मोठे संधिसाधू संक्रमण असते ते क्षयरोग जीवाणूचे. जर एखादी व्यक्ती कोणतेही उपचार घेत नसेल तर, तिला क्षयरोग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. नखे आणि केस या व्यतिरिक्त शरीराच्या कुठल्याही अवयवावर क्षयरोगाचा परिणाम होऊ शकतो. शरीरात जेथे रक्त पोचते त्या सर्व भागांवर त्याचा परिणाम होतो असे डॉ सुवर्णा हुबेकर
यांनी सांगितले.
क्षयरोगाचे दोन प्रकार आहेत – फुफ्फुसांचा क्षयरोग (पल्मनरी ट्युबरक्युलोसीस) – याचा परिणाम फुफ्फुसांवर होतो आणि एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसीस – याचा परिणाम फुफ्फुसांसोबतच इतर अवयवांवर देखील होतो. यांची लक्षणे देखील दोन प्रकारांत विभागली जाऊ शकतात – सामान्य लक्षणे आणि अवयव विशिष्ट लक्षणे. दोन आठवड्यांपेक्षा जास्त असलेला खोकला हे सर्वात जास्त आढळून येणारे लक्षण आहे. वजन कमी होणे, भूक न लागणे, रात्री ताप येणे ही सर्व प्रकारच्या क्षयरोगाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. छाती दुखणे, थकवा, झपाट्याने वजन कमी होणे, थुंकित रक्त येणे, ही एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलॉसिसच्या रुग्णांत आढळणारी इतर लक्षणे आहेत.
क्षयरोगाचे दोन गंभीर प्रकार आहेत – मिलीअरी क्षयरोग आणि क्षयरोग मेंदूज्वर
मिलीअरी क्षयरोग – याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.
क्षयरोग मेंदूज्वर – याचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो, यामुळे डोकेदुखी, ग्लानी, गुंगी अशी लक्षणे दिसतात.
लीम्फ नोड क्षयरोग (LNTB) हा सर्वात जास्त आढळून येणारा एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसीस आहे. यात मानेवर सूज येते आणि किशोरवयीन मुलींमध्ये हा आजार सर्वाधिक दिसून येतो. क्षयरोग प्ल्युरल एफ्युशन: फुफ्फुसांच्या बाहेर असणाऱ्या प्ल्युरा मध्ये जास्त द्रव जमा होऊन खोकला आणि श्वासोच्छवासाला त्रास होणे.क्षयरोगाचे दुर्मिळ प्रकार आहेत त्वचेचा क्षयरोग, डोळ्याचा क्षयरोग. क्षयरोगाचे इतरही प्रकार आहेत ज्यांचा परिणाम हृदयाचे आवरण, आतडे आणि हाडांवर देखील होतो. आपल्या देशात वंध्यत्वाचे सर्वात मोठे कारण आहे क्षयरोग असे डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी माहिती दिली.
क्षयमुक्त गोंदिया अभियान सुरुवात करतांना, आरोग्य संवादाचे महत्व आणि ते इतर महत्वाच्या प्रचार मोहीम निर्देशांपैकी एक झाले आहे, याविषयी विवेचन केले. “कोविड-19 महामारी आल्यापासून आरोग्य संवादाला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे आणि आरोग्य संवादाला मोठी चालना मिळाली आहे,” डॉ सुवर्णा हुबेकर म्हणाल्या की, आरोग्य संवादाचा भाग म्हणून सरकार जनतेने घ्यावयाच्या खबरदारी विषयी नियमितपणे कोविडवर आत्ता पर्यंत माध्यमांना आम्ही माहिती देत आहोत त्याशिवाय, माहिती आणि प्रसारण विभागातर्फे विविध विभाग वेबिनार आणि कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत विषयातील तज्ञांशी झालेल्या अशा चर्चांमुळे विषय समजून घेणे आणि त्यानुसार जनतेशी संवाद कसा करायचा हे ठरवणे यात माध्यमांना मोठी मदत होते, असे डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले.
क्षयरोगाचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी, जनसंवाद आणि व्यक्तींमधील संवाद यासाठी भारत सरकारने अवलंबलेल्या विविध संवाद प्रक्रियांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. “अमिताभ बच्चन यांना क्षयरोग विरोधी मोहिमेत सहभागी करून घेतल्याने हे आव्हान अतिशय प्रभावीपणे पेलले गेले,” असे डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले.
अतिसंसर्गजन्य रोगांच्या नियंत्रणाचे महत्व यावर बोलताना डॉ सुवर्ण हुबेकर म्हणाल्या, भारताच्या सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा उद्देश, देशाला 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करणे, हा आहे. “भारताने संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टांवर स्वाक्षरी केली आहे. वर्ष 2030 पर्यंत जगाला क्षयरोग मुक्त करणे हे याचे उद्दिष्ट आहे.”
“क्षयरोग निर्मूलनासाठी आपण सर्वंकष दृष्टिकोण अंगिकारला तरच ही उद्दिष्टे गाठणे शक्य होईल.” असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे.
जागितक क्षयरोग दिना निमित्त गोंदियात प्रत्येक आरोग्य वर्धिनी केंद्रातून जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रत्येक ब्लॉक लेवलला ग्रामीण हॉस्पिटल मधून क्षय रोग निदान व मोफत उपचार सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. निक्षय या योजनेमार्फत क्षय बाधित रुग्णांना पोशहारसाठी 500 रुपये मासिक भत्ता सरकारतर्फे दिला जात आहे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपजिल्हा रुग्णालयातुन क्षय रोगावर मोफत उपचार उपलब्ध आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नितीन वानखेडे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ नितीन कापसे यांनी दिली आहे व क्षयमुक्त गोंदिया चा निर्धार केला आहे.