प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या डाटा दुरुस्तीसाठी 25 मार्चला विशेष कॅम्प
गोंदिया 23 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी, 2019 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात एकूण 2 लाख 71 हजार 692 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून पात्र शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेतील काही लाभार्थ्यांना डाटा दुरुस्तीच्या कारणास्तव अद्याप लाभ मिळाला नसून या लाभार्थ्यांच्या डाटा दुरुस्तीसाठी 25 मार्च 2022 रोजी गावपातळीवर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 20 जानेवारी 2022 रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी गाव पातळीवर कॅम्प आयोजित करून मोहीम तत्वावर सदरची प्रलंबित दुरुस्ती पुर्ण करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने मार्च महिण्याच्या चौथ्या शुक्रवारी म्हणजेच 25 मार्च, 2022 रोजी गाव पातळीवर पीएम किसान योजना डाटा दुरुस्ती कॅम्पचे आयोजन करण्यात यावे आणि पुर्ण डाटा दुरुस्ती पर्यंत काम चालु ठेवावे असे निर्देश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिले.
यासाठी शासन निर्णयानुसार स्थापित तालुकास्तरीय समितीही तालुक्यातील गावांचे महसुल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या क्षेत्रिय कर्मचाऱ्यांमध्ये गावाचे वाटप करुन देतील व कॅम्प आयोजित करण्याची जबाबदारी निश्चीत करतील. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यास त्या गावातील डाटा दुरुस्तीसाठी असलेल्या लाभार्थ्यांची यादी तहसिल कार्यालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल. 25 मार्च 2022 रोजी अशा पध्दतीने कॅम्प आयोजित केले असल्याबाबत स्थानिक विविध माध्यामातुन यास मोठया प्रमाणावर प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच डाटा दुरुस्ती कॅम्प आयोजन यशस्वी होण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना एनआयसी मार्फत मोबाईल संदेश पाठवून त्यांचा अर्ज कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे, याबाबत कळविण्यात यावे. जेणेकरान डाटा दुरुस्ती न झाल्याने लाभापासुन वंचित असलेला लाभार्थी कॅम्पमध्ये सहभागी होऊन आवश्यक ती कागदपत्रे जमा करेल.
डाटा दुरुस्तीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वत:चे बँक खाते तपशीलसाठी पासबुक किंवा चेक बुक, आधार कार्ड, जमिनीचा ७/१२ व ८ अ चा उतारा इत्यादी कागदपत्रे कॅम्पमध्ये दुरुस्तीसाठी द्यावीत. डाटा दुरुस्तीसाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे जमा करुन ती संबंधित कॅम्प आयोजित करणाऱ्या कर्मचा-याने आपल्या तहसिल कार्यालयामध्ये जमा करावीत. याप्रमाणे आपले तालुक्यातील डाटा दुरुस्तीचे काम मार्च, 2022 अखेर 100 टक्के पूर्ण करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिले आहेत.