१२६ वर्षीय योगगुरू झाले नतमस्तक, त्यांच्या सन्मानार्थ पीएम मोदींनी वाकून केला नमस्कार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात नागरी सन्मान समारंभ-१ दरम्यान वर्ष २०२२ साठीचे दोन पद्मविभूषण,आठ पद्मभूषण आणि ५४ पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. याच दरम्यान पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी वाराणसीचे १२६ वर्षाचे योगगुरू स्वामी शिवानंद अनवाणी पायाने पोहोचले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे. यातील खास म्हणजे, १२६ वर्षाचे योगगुरू स्वामी शिवानंद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे नतमस्तक झाले. तसेच पंतप्रधान मोदी यांनीदेखील खाली झुकून त्यांना नमस्कार केला.
या सोहळ्यात अनेकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परंतु, सोहळ्यातील १२६ वर्षाचे योगगुरू स्वामी शिवानंद हे जेव्हा अनवाणी पायाने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये पोहोचले तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. या दरम्यान स्वामी शिवानंद पंतप्रधान मोदी यांच्या समोर नतमस्तक झाले. त्यानंतर राष्ट्रपतींच्या समोरही ते नतमस्तक झाले. हे पाहून राष्ट्रपती खुर्चीवरुन उठून पुढे आले आणि त्यांनी स्वामी शिवानंद यांना हात धरून उठवत पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. हा खूप भावनिक क्षण होता. पांढऱ्या रंगाचे धोतर आणि कुर्ता असा साधा वेश त्यांचा होता.
स्वामी शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी झाला असून ते सध्या १२६ वर्षांचे आहेत. इतके वय असून ही ते कोणत्याही आधाराशिवाय स्वत:च्या पायावर चालू शकतात. योगगुरू स्वामी शिवानंद यांनी आपले सर्व जीवन योग साधनेसाठी समर्पित केलं आहे. याचाच सन्मान म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.