सागवान वृक्षाची अवैध तस्करी ग्रामस्थांमुळे फसली

सडक अर्जुनी,: सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणार्‍या कोसमतोंडी सहवनक्षेत्रात 17 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास सागवान लाकूड अवैधरित्या वाहून नेणारा ट्रॅक्टर रेंगेपारवासीयांनी अडविला व अवैध लाकूड तस्करी फसली. दरम्यान या प्रकारात वनकर्मचार्‍यांचा सहभाग असल्याची शंका व्यक्त करुन याप्रकरणी वरिष्ठांकडून चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान प्रजातीचे झाडे असून अवैध वृक्षतोड व तस्करीचा विषय नेहमीच चर्चेत राहतो. याप्रकरणी वनविभाग थातूरमातूर कारवाई करीत असल्याने लाकूड तस्करांचे भावत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. असाच प्रकार मागील आठ दिवसात कोसमतोंडी सहवनपरिक्षेत्रात सुरु असल्याची बाब नागरिकांनी वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. या सहवनपरिक्षेत्रातील रेंगेपार गावाच्या पश्चिम दिशेला डोंडू टेंभरे यांच्या घराजवळील रस्त्यापासून 200 मीटर अंतरावर सरकारी कुरण जंगलातील सागवन झाडे कापले आहेत. ही झाडे कापून 8 दिवस होऊनसुद्धा आजपावेतो वनविभागाने कोणत्याच प्रकारे कार्यवाही केली नाही. त्यामुळे या प्रकारात वनविभागाच्या अधिकारीही सहभागी असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात कोसमतोंडीचे क्षेत्रसहाय्यक सुनील वलथरे यांना विचारणा केली असता, त्यांनी वृक्षतोडीबद्दल आपल्याला माहिती नसून पाहणी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.

मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. दरम्यान 17 मार्च रोजी 12 वाजताच्या सुमारास अंदाजे 15 कर्मचारी लाकूड कापून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन लाकडे ट्रॅक्टरमध्ये टाकून नेण्याच्या तयारी असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले व त्यांनी लाकूड भरलेला ट्रॅक्टर अडविला. यावेळी घटनास्थळावर उपस्थित कर्मचार्‍यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. व काढता पाय घेतला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी सुनील मडावी घटनास्थळी दाखल झाले व याप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी लाकूड भरलेला ट्रॅक्टर सोडला. मात्र या प्रकरणात वनविभागही सहभागी असल्याची शंका व्यक्त करुन वरिष्ठ अधिकारी याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करतील काय? याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत्या.

Print Friendly, PDF & Email
Share