दुचाकीवरून गांजाची तस्करी, 80kg गांजा जप्त

गोंदिया: दुचाकी वरून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून दुचाकीसह 12 लाख 975 रुपये किमतीचा 80 किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. गौतम नरेश चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई 17 मार्च रोजी रात्री 11:30 वाजता च्या सुमारास सालेकसा पोलिसांनी झालीया येथे केली. गोंदियामार्गे छत्तीसगडमधून उत्तर प्रदेशात या गांजाची तस्करी केली जात होती. गांजाच्या तस्करीसाठी आरोपी गौतम तब्बल 800 किमी अंतर दुचाकीवरुन पार करणार होता.

गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलाच लागून मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्याच्या सीमा आहेत. होळी आणि धुलिवंदन सणाच्या निमित्ताने पोलिस विभाग सतर्क होतं. यावेळी एका दुचाकीवर तरुण संशयितरित्या आढळला असता सालेकसा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. सालेकसा-आमगाव मार्गावरील झालिया गावाजवळ अडवत त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 80 किलो गांजा आढळून आला. हा गांजा छत्तीसगड राज्याच्या जगदलपूरवरुन उत्तर प्रदेशातील नोएडा इथे नेत असल्याचं त्याने सांगितलं.

80 किलो गांजा दुचाकीवर घेऊन तो जगदलपूर ते नोएडा हे तब्बल 800 किलोमीटर अंतर पार करणार होता. परंतु संशय आल्याने सालेकसा पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान गांजाचे मोठं रॅकेट उघळकीस येण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी हस्तगत केलेल्या गांजाचे बाजार मूल्य 12 लाख रुपये सांगितले जाते. अधिक तपास सालेकसा पोलिस करीत आहेत.

Share