किसान सन्मान योजनेच्या डाटा दुरुस्तीसाठी शिबिर आयोजित करा : जिल्हाधिकारी
गोंदिया: प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 2 लाख 71 हजार 692 शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. पात्र शेतकर्यांना मदतीचे वितरण करण्यात आले आहे. योजनेतील काही लाभार्थ्यांना डाटा दुरुस्तीच्या कारणास्तव अद्याप लाभ मिळाला नाही, अशा लाभार्थ्यांचा डाटा दुरुस्तीसाठी येत्या 25 मार्च रोजी गावपातळीवर शिबिर आयोजित करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिले.
राज्य स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 20 जानेवारी 2022 रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून मोहीम तत्वावर सदरची प्रलंबित दुरुस्ती पुर्ण करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने 25 मार्च रोजी गाव पातळीवर डाटा दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात यावे आणि पुर्ण डाटा दुरुस्तीपर्यंत काम चालु ठेवावे असे निर्देशही गुंडे यांनी संबंधित अधिकार्यांना दिले. यासाठी तालुकास्तरीय समितीही तालुक्यातील गावांचे महसुल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या क्षेत्रिय कर्मचार्यांमध्ये गावाचे वाटप करुन देतील व शिबिर आयोजित करण्याची जबाबदारी निश्चीत करतील. त्यानंतर संबंधित कर्मचार्यास त्या गावातील डाटा दुरुस्तीसाठी असलेल्या लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल. 25 मार्च रोजी अशा पध्दतीने शिबिर आयोजित केले असल्याबाबत स्थानिक विविध माध्यामातुन प्रसिध्दी देण्यात यावी.
तसेच डाटा दुरुस्ती शिबिर आयोजन यशस्वी होण्यासाठी संबंधित शेतकर्यांना एलआयसीमार्फत मोबाईल संदेश पाठवून त्यांचा अर्ज कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे, याबाबत कळविण्यात यावे. जेणेकरून डाटा दुरुस्ती न झाल्याने लाभापासुन वंचित असलेला लाभार्थी शिबिरामध्ये सहभागी होऊन आवश्यक ती कागदपत्रे जमा करेल. डाटा दुरुस्तीसाठी लाभार्थी शेतकर्यांनी स्वतःचे बँक खाते तपशीलसाठी पासबुक किंवा चेक बुक, आधार कार्ड, जमिनीचा 7/12 व 8 अ चा उतारा इत्यादी कागपत्रे शिबिरामध्ये दुरुस्तीसाठी द्यावीत. डाटा दुरुस्तीसाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे जमा करुन तो संबंधित शिबिर आयोजित करणार्या कर्मचार्याने आपल्या तहसील कार्यालयामध्ये जमा करावीत. याप्रमाणे आपले तालुक्यातील डाटा दुरुस्तीचे काम मार्चअखेर 100 टक्के पूर्ण करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिले आहेत.