आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे विशेष लसीकरण
गोंदिया: सद्यस्थितीत चीन आणि दक्षिण कोरिया या देशात कोरोनाचा उद्रेक परत वाढल्यानंतर भारतात चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात शनिवार 19 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी आज 17 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी कोविडच्या चौथ्या लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक पालकांनी ज्या मुलांचे जन्म जरनेवारी 2008 ते मार्च 2010 या कालावधीत झाला आहे, अशी सर्व मुले लसीकरणासाठी पात्र राहणार आहेत. लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यात कोरबेव्हॅक्स या औषधीचे 20 हजार 400 डोज आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहे. लसीकरणाचे पहिले डोज घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोज घेता येईल, असेही पाटल म्हणाले. जिल्ह्यात 909 शाळांमधील 12 ते 14 वयोगटातील अपेक्षित लाभार्थी शहरी भागात 7 हजार 200 व ग्रामीण भागात 41 हजार 900 असे एकूण 49 हजार 100 आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण संबंधित शाळांमध्ये आयोजित करण्यात येतील व याच बरोबर जिल्ह्यातील 1 उपजिल्हा रुग्णालय, 10 ग्रामीण रुग्णालय, 40 प्राथमिक आरोग्य केंद्र व 258 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी लस उपलब्ध करण्यात येईल. पालकांनी व लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने संबंधित ठिकाणी जाऊन 12 ते 14 या वयोगटातील मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पाटील यांनी पत्रपरिषदेत केले. पत्रपरिषदेला अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ. नितीन कापसे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक अनिल चव्हाण उपस्थित होते.