फॅम टूरच्या प्रतिनिधींची बोदलकसाला भेट ,नागझीरा व्याघ्र प्रकल्प येथे जंगल सफारीचा आनंद
◾️जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याचा पर्यटन विभागाचा प्रयत्न
गोंदिया 15 : देशभरातील विविध प्रांतातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेलियर्स, टूर ऑपरेटर यांच्या माध्यमातून विदर्भातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्याकरीता 14 मार्च ते 19 मार्च 2022 या कालावधीत “फॅम टूर” चे आयोजन करण्यात आले आहे. सदर पर्यटन प्रेमी आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पर्यटक निवास, बोदलकसा येथे भेट दिली. फॅम टूर प्रतिनिधींनी आज नागझीरा व्याघ्र प्रकल्प येथे जंगल सफारीचा आनंद घेतला. गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची भेट घेवून जिल्ह्यातील पर्यटन विषयी चर्चा केली. सारस पक्षी दर्शन हे गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनाचे महत्वाचे आकर्षण आहे याचा देखील “फॅम टूर” सदस्यांनी आनंद घेतला.
सदर फॅम टूर करीता आलेले देशभरातील निवडक पर्यटन व्यावसायिक हे दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, हैद्राबाद येथील पर्यटन प्रेमी असून मुंबईहून 14 मार्च 2022 रोजी नागपूर येथे दाखल झाले. उपसंचालक (पर्यटन), नागपूर प्रशांत सवाई, यांनी सदर फॅम टूर मधील टूर ऑपरेटर, हॉटेलियर्स यांचे स्वागत केले. तसेच महाराष्ट्रीय व्यंजनाची मेजवानी देण्यात आली. यावेळी विदर्भ टुरिझम असोसिएशनचे अर्जून धनवटे, सनत खेडकर, विदर्भ हॉटेल असोसिएशनचे तेजिंदरसिंग रेणू, संजय देशपांडे, राजेश अग्रवाल इत्यादी उपस्थित होते.
16 मार्चला ही चमू बोदलकसा येथे पक्षी निरिक्षणाचा आस्वाद घेणार आहे. तद्नंतर सदर फॅम टूर बोदलकसा येथून रामटेक येथे रवाना होतील. पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारी करणार आहेत. 17 मार्च 2022 रोजी रामटेक येथे वॉटर स्पोर्ट चा आनंद घेवून चिखलदरा येथे रवाना होतील. चिखलदरा येथे भिमकुंड, गाविलगड किल्ला येथे भेट देणार आहेत. नरनाळा येथे जंगल सफारीचा आनंद घेतील. 18 मार्च 2022 रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देवून जंगल सफारी करणार आहेत. 19 मार्च ला चिखलदरा येथून नागपूर मार्गे मुंबई करीता रवाना होतील.