Breaking: बारावीचा केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटला

बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यभरात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून शिक्षण मंडळाकडून परीक्षा जबाबदारपणे घेण्यात येत आहे. परंतू तरीही मुंबईत बारावीचा रसायन शास्त्राचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. इयत्ता बारावीच्या केमिस्ट्री विषयाच्या पेपरफुटीप्रकरणी प्रोफेसर मुकेश धनसिंग यादव याला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. त्याची मालाड येथे खासगी शिकवणी आहे. त्याने एका विद्यार्थिनीला पेपर सुरू होण्याच्या काही मिनिटे अगोदर व्हॉट्सअॅपवर पाठवला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

17 जणांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

विलेपार्ले येथील एका महाविद्यालयात बारावीचे सेंटर आहे. शनिवारी सकाळी विद्यार्थी हे पेपर देण्यासाठी वर्गात आले तेव्हा एक मुलगी पेपर देण्यासाठी वेळेत आली नसल्याचे शिक्षकाच्या निदर्शनास आले. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळाने अचानक आवाज आल्याने शिक्षक शौचालयाजवळ गेले. तेव्हा ती मुलगी व्हॉट्सअॅपवर काही तरी पाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या मुलीचे व्हॉट्सअॅप पाहिले असता त्यात केमिस्ट्री विषयाचे एमसीक्यूचे प्रश्न होते. हा प्रकार गंभीर असल्याने शिक्षकाने याची माहिती परीक्षा मंडळाला दिली. काही वेळातच परीक्षा मंडळाचे अधिकारी महाविद्यालयात आले. त्यांच्या तक्रारीवरून विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पोलिसांनी त्या मुलीची चौकशी केली असता मुकेशचे नाव समोर आले. पोलिसांनी मालाड येथून मुकेशला अटक केली. मुकेशने त्या मुलीला पेपर पाठवल्यानंतर तो पेपर 17 जणांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाला होता. पेपरफुटीप्रकरणी मुकेशविरोधात महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली. तर पेपरफुटीप्रकरणी दोन अल्पवयीन मुलींची चौकशी करून त्या दोघींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. मुकेशला केमिस्ट्रीचा पेपर कोणी दिला, त्याने तो पेपर आणखी कोणाकोणाला दिला होता, यापूर्वी मुकेशने कोणते पेपर विद्यार्थ्यांना दिले होते का याचा तपास आता विलेपार्ले पोलीस करत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share