कडक सॅल्यूट : पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पार पडला भव्य आदिवासी सामुहीक विवाह सोहळा

प्रहार टाईम्स वृत्तसंस्था
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयातील आदिवासी उपवर-वधु यांना नवजीवनाची सुरुवात करुन देण्याकरीता तसेच आदिवासी बांधवांची संस्कृती जोपासण्याकरीता गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व मैत्री परीवार संस्था नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने “भव्य सामुहीक आदिवासी विवाह सोहळा” अभिनव लॉन गडचिरोली येथे आज पार पडला.गडचिरोली पोलीस दलामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळयात १६ आत्मसमर्पत व दुर्गम व अतिदुर्गम भागातील इतर १११ असे एकुण ११७ जोडपे सहभागी झाले होते. या विवाह सोहळ्यातील सहभागी जोडप्यांना गडचिरोली पोलीस दल व मैत्री परीवारातर्फे संसारोपयोगी भेटवस्तु देण्यात आल्या. सदर विवाह सोहळा दरम्यान कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करण्यात येवुन, गडचिरोली पोलीस दलामार्फत विवाह सोहळ्याकरीता अभिनव लॉन गडचिरोली येथे सुसज्ज मंडपाची व्यवस्था केली होती. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोस्टे, उपपोस्टे व पोमके स्तरावर जनजागरण मेळावा, महामेळावा दरम्यान सुध्दा भव्य सामुहीक आदिवासी विवाह सोहळा पार पाडला जातो. सन २०२१ या वर्षात पोस्टे, उपपोस्टे व पोमके स्तरावर ६८ आदिवासी जोडप्यांचे विवाह पार पाडण्यात आले.
सन २०२१-२२ या वर्षात पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलाने प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र ५ हजार ४५७, विविध प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध योजना १९ हजार ४९५, विविध प्रकारचे दाखले ६२ हजार ३६६, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना १५२, रोजगार व व्होकशनल ट्रेनिंग २ हजार ८२१, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सत्र १ हजार १५० प्रोजेक्ट कृषी समृध्दी अंतर्गत ८ हजार ७४९, प्रोजेक्ट शक्ती ७२०, इतर उपक्रम ८ हजार ४४४, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी करीता प्रवेश विद्यार्थी संख्या ३८५ असे एकूण १,०९,७३९ नागरीकांना लाभ मिळवून दिला आहे. सन २०२२ या चालु वर्षात सुरक्षा गार्ड ५२, ब्युटीपार्लर ३५, बदकपालन ५०, स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत ३५, भाजीपाला लागवड प्रशिक्षण १५०, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण २०० असे एकूण ५२२ युवक-युवती व नागरीकांना लाभ मिळवून देण्यात आला आहे.
या भव्य आदिवासी सामुहीक विवाह सोहळ्यास पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे, उपविभागिय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रा. प्रमोद पेंडके, मैत्री परिवार संस्था मार्गदर्शक गडचिरोली डॉ. शिवनाथ कुंभारे, पुणे मैत्री परिवार संस्था मार्गदर्शक बाळासाहेब अरगडे (पाटील) मैत्री संस्था मार्गदर्शक सुनिल चिलेकर, व इतर मान्यवर उपस्थित होते.
या भव्य सामुहीक आदिवासी विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागिय पोलीस अधिकारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व अंमलदार, इतर शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार, नियोजित पोस्टे, उपपोस्टे व पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेवुन या विवाह सोहळयाकरीता मोलाची कामगिरी पार पाडली.

Share