चला तर परीक्षेची तयारी करूया

सौ गायत्री विवेक भुसारी
शिक्षक समुपदेशक. (समर्थ विद्यालय लाखनी)राज्य मंडळ एस. सी. ई.आर. टी. पुणे.

गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थी ऑनलाइन व काही भागातील विद्यार्थी ऑफलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. मागील वर्षी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्या नाहीत .आताही होणार नाहीत हा विद्यार्थ्यांचा संभ्रम आता दूर झालेला आहे.
राज्य मंडळाने 75% टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेचे आयोजन केलेले आहे. तसेच लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपर साठी तीस मिनिटांचा जास्त वेळ व 40 ते 60 गुणांच्या पेपर साठी पंधरा मिनिटांचा जास्त वेळ दिलेला आहे .जेणेकरून विद्यार्थ्यांची मानसिकता पेपर लिहिण्याची असायला पाहिजे. विद्यार्थ्यांवर कोणतेही दडपण असायला नको, यासाठी त्याच शाळेत परीक्षेचे केंद्र आणि परीक्षेसाठी शाळेचे शिक्षकच परीक्षक असणार आहेत.
विद्यार्थ्यांना सराव होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत सराव प्रश्नसंच (प्रश्नपेढी)www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येऊ नये, परीक्षेबद्दल भीती निर्माण होऊ नये ,यासाठी प्रशिक्षित समुपदेशक हेल्पलाईन सेवा राज्य मंडळाने उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी घाबरून जायचे कारण नाही .वेळेचे नियोजन करून पाठ्य पुस्तकांचे वाचन केल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल व विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतील.

Share