साहेब,माझ्या मृत्यूच्या कार्यक्रमासाठी तरी हक्काचे पैसे मिळतील का हो; निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची आर्त हाक

अधिसंख्य दाखवून निवृत्तिवेतन अडविले,उदरनिर्वाहाचा प्रश्

प्रतिनिधी/ अर्जुनी मोरगाव: ३३ वर्षे पोलीस खात्यात राहून सेवा केली.ऐन वार्धक्याच्या काळात अधिसंख्य असल्याचे दाखवून सेवेचे सर्व लाभ अडविले.निवृत्तीनंतरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचे त्या निवृत्त सहायक फौजदाराचे स्वप्न भंगले.कौटुंबिक खर्च कुठून करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

जगदीश गोपाळा चौधरी (ब नं ४५६) यांना २२ फेब्रुवारी १९८८ रोजी पोलीस खात्यात नोकरी मिळाली.ते ६ एप्रिल १९९१ रोजी सेवेत कायम झाले.३१ वर्षाच्या सुरळीत सेवेनंतर ३१ जाने २०२१ रोजी ते सहा फौजदार पदावरून निवृत्त झाले.त्यांची नियुक्ती कोणत्या जात प्रवर्गातून झाली त्याचा नियुक्ती आदेशात उल्लेख नाही.नियुक्तीचे वेळी त्यांची जात अनुसूचित जमाती प्रवर्गात होती.कालांतराने ती विशेष मागास प्रवर्गात आली.निवृत्तीनंतर तब्बल सात महिन्याने त्यांना अधिसंख्य असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षकांचे २४ ऑगस्ट २०२१ चे पत्र मिळाले.

३० ऑगस्ट २०१८ रोजी त्यांना सहा फौजदार म्हणून पदोन्नती देण्यात आली होती.त्यांची जात विशेष मागास प्रवर्गात आली असल्याने त्यांनी २६ सप्टेंबर २०१६ रोजी तयार झालेले या जातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले. तरी सुध्दा त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले.

सेवानिवृत्ती नंतर त्यांना निवृत्तीवेतन,जमा असलेल्या रजेचे वेतन,सेवा उपदान व उपदान विक्रीची राशी निवृत्तीनंतर एक वर्ष लोटूनही मिळाली नाही.निवृत्तीनंतर तरुण मुला-मुलींचे विवाह,घर,आरोग्य उपचारासाठी खर्च,कौटुंबिक खर्च व उदरनिर्वाहासाठी प्रत्येक व्यक्ती स्वप्न रंगवत नियोजन करतो. मात्र त्यांच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला आहे.सततच्या चिंतेमुळे त्यांना अर्धांगवायूचा झटका आला.दोन प्रसंगात अपघात झाले.माझ्या मृत्यूच्या कार्यावेळी तरी माझ्या हक्काचे पैसे मिळतील का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share