कोरोनामुक्त गाव स्पर्धेसाठी केवळ चार प्रस्ताव

गोंदिया: जिल्हात ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, गावे कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गत वर्षी जून महिन्यात केली होती. गोंदिया जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायतीपैकी जिल्हा प्रशासनाकडे या योजनेसाठी केवळ 4 प्रस्ताव आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून मिळाली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या गावांना राज्य शासनाने 50 लाख रुपयांपर्यंत पुरस्कार जाहीर केले आहेत. जिल्ह्यात 547 ग्रामपंचायती असून यातील बहुतांश गावांनी गावांनी चांगले काम करून गावे कोरोनामुक्त केली आहेत. असे असतानाही यातील बहुतांश गावांकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव समोर आले नसल्याने ही गावे पुरस्कारापासून वंचित राहणार आहेत. कोरोनामुक्त गाव उपक्रमासाठी मागील वर्षभरापासून सातत्याने विविध उपक्रम राबविली जात आहेत. उपक्रमांना चांगला प्रतिसादही मिळाला. त्यामुळे गतकाळात कोरोना संसर्गाच्या दुसर्‍याला लाटेत बहुतांश गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘माझं मुल, माझी जबाबदारी’, ‘माझ गावं कोरोनामुक्त गाव’, ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’, अशा प्रकारची विविध उपक्रमे राबविली गेली. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात कोरोना नियंत्रण समितीही स्थापन करण्यात आली. समितीने गावातील शिक्षक, ग्रामसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविका आदींच्या सहकार्याने गावे कोरोनामुक्त केली. कोरोनामुक्त झालेल्या गावांना प्रोत्साहन अनुदान म्हणून रोख रक्कम व विकासकामांसाठी विशेष निधी मिळणार आहे. जिल्ह्यातून आमगाव तालुक्यातील करंजी, गोंदिया तालुक्यातील दिवारी आणि तिरोडा तालुक्यातील मुरपार व कुलपा या चार ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहे.

कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख, 25 लाख व 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. राज्यातील 6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकुण 18 बक्षीसे दिली जातील. यासाठी बक्षीसांची एकूण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल. या शिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष 2515 व 3054 या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत. यामध्ये पात्र ठरणार्‍या 6 विभागांतील प्रत्येकी 3 गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यासाठी 50 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. 

22 निकषांच्या आधारावर निवड

कोरोना व्यवस्थापनासाठी ग्रामस्तरावर करोनामुक्त गाव समितीची स्थापना, मुख्य समितीच्या अंतर्गत विविध पथकांची नियुक्ती, बाधित कुटुंबांचे सर्वेक्षण व चाचण्या घेणे, चाचण्यांची सोय गाव पातळीवर उपलब्ध करणे, रुग्णांना विलगीकरणात ठेवणे, रुग्णांसाठी वाहतुकीची व्यवस्था अल्पदरात करणे, विलगीकरणाच्या ठिकाणच्या सोयी, सुविधा, गावातील डॉक्टरांचा या कामातील सहभाग, बाधित शेतकर्‍यांचा शेतीमाल, दुध विक्रीसाठी पथकांनी मदत करणे, गावातील संस्था, संघटनांचा करोनामुक्तीत सहभाग, रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठीचे उपक्रम, लसीकरणाचे योग्य नियोजन, जनजागृती, बाहेरगावी जाणार्‍या लोकांनी घेतलेली खबरदारी, मृत्यूदरावर नियंत्रण, पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांचा सांभाळ अशा 22 निकषांच्या आधारे गावांची निवड करण्यात येणार आहे. इतर योजनांप्रमाणेच यासाठीही मूल्यांकन समित्या स्थापन केल्या जाऊन त्यामार्फत निवड केली जाणार आहे. 

कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आला. व्हीसीद्वारे वेळोवेळी ग्रामसेवकांना मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील बहुतांश गावे कोरोनामुक्त झाली असली तरी आतापर्यंत चार ग्रामपंचायतीचे प्रस्ताव आल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share