गोंदिया: 843 बालकांना मिळणार RTE निःशुल्क प्रवेश
गोंदिया 21: जिल्ह्यातील 141 शाळांतील 843 जागांसाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी 25 टक्के आरक्षित जागांवर आभासी प्रवेश प्रक्रिया 16 फेब्रुवारीपासून होणार होती. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही आरटीईचे वेळापत्रक कोलमडले आहे. 17 फेब्रुवारीपर्यंत शाळा नोंदणीचे काम सुरू होते. अद्याप आरटीई प्रवेश अर्ज भरण्याची तारीख निश्चित झाली नसल्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत.
यंदा 2009 च्या सुधारित कायद्यानुसार अंतर्गत आरटीई शैक्षणिक वर्ष 2022 मधील प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. शाळा नोंदणीची मुदत ही 15 फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली होती. नोंदणी केलेल्या शाळांचे सत्यापन केल्यानंतर 16 फेब्रुवारीपासून पालकांना प्रवेशाचे अर्ज भरता येणार होते. आरटीईच्या बदललेल्या वेळापत्रकाविषयी कोणत्याही सूचना मिळत नसल्यामुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व कामे सोडून आरटीई प्रवेश अर्जाच्या तारखेकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. पालकांना मदतीसाठी कोणतीही हेल्पलाईन नसल्यामुळे कोणतीही माहिती मिळत नाही. प्रवेश भरण्याविषयी अजूनही शासनाकडून कोणत्याच सूचना आल्या नसल्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. शासनाने आरटीईच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्यक्षात मात्र अजून प्रवेश अर्ज भरायलाच सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ही प्रवेश प्रकि‘या नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाल्या तरी लांबणार असे दिसत आहे.