गोंदिया जिल्ह्यातील 69 प्रकल्पांत फक्त 44 % पाणीसाठा शिल्लक

◾️उन्हाळ्यात चिंता वाढण्याची शक्यता

गोंदिया 16: जिल्ह्यातील धरणसाठ्यात झपाट्याने घट होत असून आजमितीस जिल्ह्यातील 9 मध्यम, 22 लघु व 38 माजी मालगुजारी 38 अशा एकूण 69 प्रकल्पांत 44 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या यंदा 6 टक्के साठा कमी आहे. गतवर्षी याच कालावधीत 83 टक्के तर यंदा 71 टक्के जलसाठी शिल्लक आहे.

जिल्ह्यातील जलाशयांची पाणी साठवण क्षमता 205.493 दशलक्ष घन मीटर आहे. सद्यस्थितीत राज्य शासनाच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील एकूण 69 प्रकल्पांमध्ये 90.613 दशलक्ष घनमीटर एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याच पाण्यावर जिल्हावासीयांची पुढील भिस्त अवलंबून आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात 6 टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील 9 मध्यम प्रकल्पात आज स्थितीत 36.87, 22 लघु प्रकल्पात 51.45 आणि 38 माजी मालगुजारी तलावात 49.12 टक्के अशा एकूण 69 जलाशयांमध्ये 44.10 टक्के साठा शिल्लक आहे.

गतवर्षी याच तारखेला अनुक्रमे 47.27, 55.18, 42.96 असा एकूण 49.90 टक्के साठा शिल्लक होता. तर गतवर्षी याच तारखेत 102.527 दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा होता तर आज स्थितीत 90.613 दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा शिल्लक आहे. गोंदिया जिल्हा तलावांचा म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या जिल्ह्यात केवळ 35 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. सिंचनाची परिपूर्ण सोय नसल्याने अनेकदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नापिकीचा सामना करावा लागतो. खरीप हंगामात पिकांना सिंचनानंतर आता 44.10 टक्के साठा शिल्लक आहे. याच साठ्यातून रब्बी पिकांना सिंचन आणि पिण्याचे पाण्याची सोय करावी लागत आहे.

Share