160 आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळणार अनुदान

गोंदिया 15: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह योजना राबवली जाते. केंद्र व राज्य सरकारकडून यासाठी निधी मिळतो. परंतु, गत अनेक महिन्यांपासून निधी रखडून होता. माध्यमांनी वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभागाने वृत्ताची दखल घेत सदर योजनेसाठी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी पात्र 160 जोडप्यांना वितरित केला जाणार आहे.

समाजातील जातीभद नष्ट होऊन आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या वतीने आंतरजातीय विवाह योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति जोडपा 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे 9 डिसेंबर 2022 पर्यंत 165 जोडप्यांनी अर्ज केले होते. अर्ज करून सुद्धा या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. यासाठी शासनाकडून 82 लाख 50 हजार रुपयांचा निधीची गरज आहे. 1 फेब्रुवारी 2010 पूर्वी अशा जोडप्यांना 15 हजार रुपयांची मदत मिळायची. त्यानंतर अर्थसाहाय्य 50 हजार रुपये करण्यात आले. केंद्र व राज्याकडून एकत्रित निधी आल्यावर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून पात्र जोडप्यांना धनादेश दिला जातो.

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 165 जोडपे वर्षभरापासून अर्थसाहाय्याच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून निधीच प्राप्त झाला नसल्याने पात्र लाभार्थी जोडप्यांची आर्थिक विवंचना होत आहे. यासंदर्भात दैनिक तरुण भारतने 10 डिसेंबर 2022 च्या अंकात ‘आंतरजातीय विवाह योजना निधीअभावी बासनात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत शासनाकडून 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 160 लाभार्थ्यांना हा निधी दिला जाणार आहे. पाच प्रस्ताव प्रलंबित असून नवीन 31 प्रस्ताव आजपर्यंत प्राप्त झाल्याचे जिल्हा समाजकल्याण कार्यालयाचे निरीक्षक योगेश कडव यांनी सांगितले. 

शासनाने 160 लाभार्थ्यांसाठी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी कार्यालयास हस्तांतरित झाल्यानंतर लवकरच लाभार्थी जोडप्यांना दिला जाईल. उर्वरित प्रस्तावांसाठी निधीची मागणी करण्यात आल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तुकाराम बर्गे यांनी सांगितले.

Share