कचारगड: आदिवासी बांधवांचा कुंभमेळा 14 फेब्रुवारीपासून

सालेकसा 12:आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असलेल्या कचारगड येथे फेब्रुवारी महिन्यात यात्रा भरते. महाराष्ट्रासह देशाच्या काना-कोपऱ्यातून आदिवासी बांधव येथे येतात. आदिवासी बांधवांच्या आस्थेचे केंद्र असलेल्या कचारगड येथे यावर्षी 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान महागोंगोना कोयापूनेम महापूजा आयोजित करण्यात आली आहे.

आदिवासींचे उगमस्थान आणि आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या कचारगड येथे 14 फेब्रुवारीपासून पारी कोपारलिंगोची पूजा-अर्चा सुरू होणार आहे. यानिमित्त येथे देशाच्या काना-कोपऱ्यातून भाविक दर्शनाला येणार आहे. त्याकरिता स्थानिक समिती आणि प्रशासनातर्फे तयारी सुरू झाली आहे. वर्षभरातून एकदाच होणाऱ्या या यात्रेदरम्यान आदिवासी समाजबांधवांचा कुंभमेळा भरणार आहे.
भारतात एका भागाला गोंडवाना असे संबोधले जाते. त्यात सध्याचे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगाना, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगड राज्याचा समावेश होतो. हे भाग आता राज्या-राज्यांत विभागले गेले आहे. गोंडवानामध्ये गोंड राजांचे साम्राज्य होते. आजही या भागात पुरातन कालीन साम्राज्याच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. त्याच प्रकारचा पुरावा कचारगड येथे देखील बघावयास मिळतो. कचारगड गुफा आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असल्याचे सांगितले जाते. ही गुफा महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सिमेवर सालेकसा तालुक्याच्या टोकावर आहे. निसर्गसंपन्न जंगल आणि टेकड्यांनी आच्छादलेला असा हा भूभाग आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अजिंठा, एलोरा तसेच विशाखापट्टनम येथील गुफा परिचीत आहेत. मात्र कचारगडची फारशी ख्याती बाहेर पोहोचली नाही. मात्र कचारगड येथे आदिवासींचे आराध्य दैवत असल्याने येथे देशभरातील आदिवासी बांधव सहकुटुंब येथे वर्षातून एकदा भरणाऱ्या जत्रेला येवून आपल्या आराध्य दैवतांची पूजाअर्चा करतात. फेब्रुवारी महिन्यात आदिवासी बांधवांचा येथे महाकुंभ भरतो. या यात्रेत पाच लाखांहून अधिक आदिवासी बांधव हजेरी लावतात. समुद्रसपाटीपासून 518 मीटर उच असलेल्या गुफेचा शोध शेकडो वर्षांपूर्वी गोंड समाजाचे पहिले गुरू पाहंदी पारी कोपार लिंगो यांनी लावून माता काली कंकालीच्या 33 कोटी पूत्रांना मुक्त केले असल्याची आख्यायिका आहे. आदिवासी समुदायातील आपल्या बालकांना मुक्त केल्यानंतर 33 कोटी देवतांचे नामकरण करण्यात आले. आज गोंड समाज त्यात देवी-दैवतांची पूजा करतात. जल, जंगल आणि जमीन याकरिता लढणाऱे आदिवासी बांधव प्रकृती आणि मानवाद्वारे तयार करण्यात आलेल्या साहित्याचे पूजन करण्यात येते. सर्व देवांचा या साहित्य आणि प्रकृतीमध्ये वास असल्याचे आदिवासी समाजात मान्यता आहे.

पाच हजार वर्षांपूर्वी धर्म स्थापणा

आदिवासी समाजाचे आद्य धर्मगुरू पारी कोपाल लिंगो यांनी पाच हजार वर्षांपूर्वी कचारगड येथे गोंड प्राकृतिक सम्मत धर्माची स्थापना केली होती, असे सांगितले जाते. त्यामुळेच या गुफेचे नामकरण पारी कोपार लिंगो कचारगड असे करण्यात आले. पारी कोपार लिंगो यांनी लहान मोठ्या धर्मांना एकत्र करून गोंड प्राकृतिक सम्मत धर्माची स्थापना केली होती. त्यांतर गोंड राजांनी आपल्या लहान-लहान राज्यांची स्थापना करून चार विभागांत वाटून घेतले होते. त्यात येरगुट्टाकोर, उम्मोगु्टाकोर, सहिमालगुट्टाकोर आणि अफोकागुट्टाकोर यांचा समावेश होता. कचारगड येथील यात्रेदरम्यान आदिवासी बांधव यात्रेदरम्यान दरवर्षी संगीत, गीत, नृत्य आणि रंगमंचाच्या माध्यमातून आपल्या सास्कृतिक कला सादर करून त्या जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Share